पंढरपूरकरांनी अभिजीत पाटलांना साथ दिली, त्यांच्यासारखं नेतृत्व तयार केलं. आता या नेतृत्वाच्या पाठीशी उभे राहण्याची आमची जबाबदारी असल्याचं म्हणत पवारांनी अप्रत्यक्षरित्या पाटलांचं तिकीटच फिक्स केलं. औदुंबरअण्णा पाटील, भारत भालके यांच्यानंतर तालुक्याचा पोरकेपणा घालवण्याची ताकद अभिजित पाटलांमध्ये असल्याचे सांगत त्यांनी फक्त तिकिट जाहीर करण्याची औपचारिकता बाकी ठेवली. पण या सगळ्यानंतर ‘विठ्ठल परिवार’ नाराज झालाय.
- भगीरथ भालके, कल्याणराव काळे, गणेश पाटील आणि युवराज पाटील नाराज असल्याची माहिती
- आज सकाळी सोलापूर गाठत या सगळ्यांनी पवारांची भेट घेतली
- आपली नाराजी त्यांनी पवारांसमोर बोलून दाखवली
- यात आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, कारखान्यांच्या निवडणुकीसंदर्भात चर्चा झाली
- एकमेकांच्या संस्थेत कुणी हस्तक्षेप करायचा नाही, असं पवारांनी मत दिल्याची माहिती
- विठ्ठल परिवारातील नेत्यांची मुंबईत बैठक होईल, अशीही पवारांकडून समजूत
त्याचवेळी एकमेकांमधील मतभेद दूर करण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी ग्वाही पवारांनी काळे, भालके आणि पाटील यांना दिल्याची माहिती आहे. अभिजित पाटील आता राष्ट्रवादीमध्ये आल्यामुळे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी एकमेकांच्या संस्थेत निवडणूक लावणं, समोरासमोर जाणं, हे काही योग्य नाही. त्यामुळे आगाामी काळात विठ्ठल परिवारातील नेते राष्ट्रवादीच्या नेतृत्वाखाली एकत्र येणार का? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होतोय. मुंबईतील बैठकीला या चारही नेत्यांसह अभिजीत पाटलांना देखील बोलावलं बैठकीसाठी बोलावलं जाणार असल्याची माहिती आहे.
भालकेंनी घेतली पटोलेंची भेट, नाना म्हणाले काँग्रेसमध्ये स्वागत आहे!
अशातच पवारांच्या भेटीनंतर भगीरथ भालके यांनी काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांचीही भेट घेतल्याची माहिती आहे. या दोघांत बंद दाराआड बराच वेळ चर्चा झाली. भालके परिवार संकटात असल्यास त्यांच्या पाठिशी आहोत. आम्ही संकटात एकटे सोडत नाही. भालके परिवार नाराज असल्यास आम्ही त्यांना साथ देऊ. त्यांची इच्छा असल्यास त्यांनी काँग्रेसमध्ये यावं, पण आम्ही यासाठी जबरदस्ती करणार नाही, अशी प्रतिक्रिया भेटीनंतर नाना पटोले यांनी दिलीये.