कसब्याचे नवनिर्वाचित आमदार रवींद्र धंगेकर यांचा सत्कार ज्येष्ठ नेते तथा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते करण्यात आला. सांगोल्याच्या अन्नपूर्णाबाई होनराव नाट्यगृहात हा समारंभ पार पडला. यावेळी केलेल्या भाषणात भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी विरोधी पक्षांनी एकत्र येण्याची गरज पवारांनी बोलून दाखवली. यावेळी त्यांनी आवर्जून कसब्याचं उदाहरण देऊन विद्यमान शिंदे सरकारबद्दल जनतेच्या मनात असलेला रोष सांगितला.
सावंतवाडीची पोरं म्हणाली, आ गऐ गद्दार…
शरद पवार म्हणाले, गेल्या आठवड्यामध्ये माझे सावंतवाडीमध्ये शिक्षण क्षेत्रात काम करणारे एक निवृत्त मित्र सावंतवाडीला गेले व परत आले. मी त्यांना सहज विचारले की कोकणात काय परिस्थिती आहे. सरकार ज्यांच्या हातामध्ये आहे त्यांच्याबद्दल लोकांमध्ये काय भावना आहे?
त्यांनी सांगितले की सावंतवाडीमध्ये गेल्यानंतर रस्त्याने फिरायला जायला निघालो आणि तेव्हा रस्त्यावरून तिरंगा लावलेली सरकारी गाडी गेली तर शाळेतील मुलं ‘आ गए गद्दार, खोकेवाले आ गए’ असं म्हणायला लागली. लहान मुलांच्या तोंडात सुद्धा खोके आणि खोकेवाले हा शब्द बसलेला आहे.
शरद पवार यांनी हा किस्सा सांगताच लोकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. त्यावर पवार म्हणाले, “येत्या काळात ज्या काही निवडणुका येतील त्या वेळी महाविकास आघाडीच्या पाठीशी अशीच शक्ती उभी करा आणि महाराष्ट्राचे राजकारण व देशाचे राजकारण योग्य रस्त्यावर आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करा”
लोणार समाजातून आलेल्या रवींद्र धंगेकरांचं कर्तृत्व मोठं : पवार
सांगोला येथे आमदार रवींद्र धंगेकर यांच्या सन्मानासाठी आज आपण एकत्रित आलो. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेना, शेतकरी कामगार पक्ष आणि अन्य पक्ष या सर्वांना एकत्रित करून उद्याचा महाराष्ट्र योग्य रस्त्यावर नेण्याचे काम करण्याची तयारी आम्ही केली. या सगळ्यांचा उमेदवार पुणे शहरात रिक्त झालेल्या विधानसभा जागेवर लढण्यासाठी काँग्रेस पक्षाने दिला. रवींद्र धंगेकर, त्यांच्या सुविद्य पत्नी व त्यांच्याबद्दल आस्था असणारे सर्व बंधू-भगिनी इथे आले आहेत. अतिशय आनंद वाटणारा असा हा समारंभ आहे.
ज्यांच्या समाजाची ५० मतं नाहीत, ते धंगेकर पुण्यात बहुमतांनी विजयी झाले : पवार
रवींद्र धंगेकर अतिशय लहान समाजातून आलेले आहेत. निवडणुका लढवणे सोपे नाही. पण कर्तृत्व असले, लोकांशी बांधिलकी असली की लोक लहान-मोठा बघत नाहीत. त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे पुणे शहरात ज्या मतदारसंघात धंगेकरांची ५० सुद्धा मतं नाहीत त्या ठिकाणी हजारो मतांनी ते विजयी झाले आणि महाराष्ट्रात नवीन इतिहास तयार करण्याची कामगिरी त्यांनी केली. म्हणून त्यांच्या सत्कार करण्यासाठी आपण येथे आलो आहोत.
पुणे शहर हे देशातील महत्त्वाचे शहर आहे. सांस्कृतिक व शैक्षणिक राजधानी आहे. तिथले लोक विचारी आहेत. मला एक आनंद आहे की काँग्रेस पक्षाने रिक्त जागेसाठी रवींद्र धंगेकरांची निवड केली. पुणे शहरामध्ये आधी सांगितल्याप्रमाणे जातपात न बघता लोकांनी रवींद्र धंगेकर यांना पाठिंबा दिला. मी चौकशी केली. सर्वांनी सांगितले की हा उमेदवार असा आहे की मतदारसंघात किंवा शहरात समाजातील लहान माणसाचं दुखणं त्यांच्या कानावर आलं तर ते लगेच मोटारसायकलवर बसून जाणार व ते दुःख दूर करण्यासाठी जे काही शक्य असेल ते करणार. हे काम त्यांनी आयुष्यभर केले व त्याची नोंद पुणे शहरातील लोकांनीही घेतली. त्यामुळे मोठ्या मतांनी त्यांना विजयी करण्यात आले.
राजकारण आता आपल्याला सामान्य लोकांच्या हातात द्यायचंय : शरद पवार
आपल्याला हीच भूमिका येथून पुढे घ्यायची आहे. राजकारण हे सामान्य माणसाच्या हातात आणायचे आहे. पक्ष म्हणून त्यांना संधी देत असू. यापूर्वी या संबंधी काही निकाल आम्ही घेतले होते. अलीकडच्या काळामध्ये काही निकाल काँग्रेस पक्षाने घेतले. मध्यंतरी अमरावतीला एक जागा रिक्त झाली त्या जागेवर धीरज लिंगाडे यांची निवड केली. अमरावतीच्या पदवीधर मतदारसंघातून धीरज लिंगाडे हे त्याठिकाणी मोठ्या मतांनी विजयी झाले. एक नवीन राजकारण आज काँग्रेस पक्ष व सहकाऱ्यांच्यावतीने आपण करू शकतो असा विश्वास समाजातील लहान समाजातील लोकांना देण्यात येत आहे.
मी ज्या मतदारसंघातून अनेक वर्षे निवडणुका लढवल्या तिथे माझ्या निवडणुकीची जबाबदारी घेणारे दोन-तीन लोक होते. त्यामध्ये एक नाव होते बाळासारहेब गीते यांचे. ते लोणार समाजाचे होते. मी निवडणुकीच्या प्रचाराला जावो वा ना जावो माझ्या सबंध निवडणुकीची जबाबदारी बाळासाहेब घेत असत. याचा अर्थ एकच आहे की संधी दिली तर या लहान समाजातील लोक कर्तृत्व दाखवायला कमी पडत नाहीत. ती संधी महाविकास आघाडीने विशेषतः काँग्रेस पक्षाने रवींद्र धंगेकर यांना दिली. त्याचं सोनं करण्याची भूमिका तेथील मतदारसंघातील मतदारांनी घेतली
मला लोकसभेत पाठवलंत, सांगोल्याचे ऋण कधी विसरू शकत नाही : पवार
सांगोला हा महाराष्ट्रातील आगळा वेगळा तालुका. एकेकाळी सांगोला म्हटला की दुष्काळ आठवायचा. पण हे चित्र बदलायचा निर्धार आमचे ज्येष्ठ सहकारी गणपतराव देशमुख यांनी केले. देशमुख यांनी या तालुक्याचा चेहरा बदलण्याचे काम केले, अनेक संस्था उभ्या केल्या, कृत्रिम पाणी आणण्यासाठी अनेक प्रयत्न केले, अन्य व्यवसायांच्या पाठीशी शक्ती उभी केली. उभं आयुष्य त्यांनी समाजातील लहान घटकांसाठी झोकून देऊन काम केले हे आम्ही कधी विसरू शकत नाही. हे सांगोल्याचे वैशिष्ट्य आहे. याच सांगोल्यात गणपतराव यांची गादी पुढे चालवणाऱ्या, स्वच्छ चारित्र्याच्या, लहान माणसाला अखंड मदत करणाऱ्या रवींद्र धंगेकरांचा सत्कार होत आहे याचा मला अतिशय मनापासून आनंद आहे.
मलाही तुम्ही मोठ्या संख्येने निवडून दिले. लोकसभेत पाठवले. देशाच्या केंद्र सरकारमध्ये पाठवले. त्यामुळे सांगोल्याचे ऋण मी कधी विसरू शकत नाही. सांगोल्याने अनेक क्षेत्रात काम केले. आज दुष्काळी भाग म्हटल्यानंतर काहीना काही गोष्टी कराव्या लागतात. पण आज दुर्दैवाने महाराष्ट्राची व देशाची सत्ता ज्यांच्याकडे आहे त्यांना समाजाच्या दुबळ्या घटकांबद्दलची आस्था हा विषय माहीत नाही, अशी टीका पवारांनी केली.
सत्तेचा गैरवापर निवडणुकीत कसा केला जातो हे भाजपने दाखवलं
सध्या कर्नाटकात निवडणूक प्रचार सुरू आहे. देशाचे प्रधानमंत्री, देशाचे सर्व मंत्री त्या ठिकाणी सकाळ-संध्याकाळ प्रचार करतात. उद्या मी ही कर्नाटकमध्ये जाणार आहे. त्या ठिकाणी बघितल्यानंतर, ऐकल्यानंतर सत्तेचा गैरवापर हा निवडणुकीत कसा केला जातो हे भाजपाने सबंध देशाला दाखवले आहे. तेच काम आज कर्नाटकमध्ये केले जात आहे. देशात अनेक ठिकाणी लोकांना बदल हवा आहे, पण तो बदल करण्यासाठी लोकांनी निर्णय घेतल्यानंतरही अन्य मार्गाने सरकारं उलटीपालटी करण्याचे काम आज देशाच्या नेतृत्वाकडून केले जाते, अशी टीका पवारांनी केली.
महाविकास आघाडीच्या पाठीमागे उभे राहा
महाराष्ट्रात ही जी महाविकास आघाडी झालेली आहे, त्याला शक्ती देणं, त्याला पाठिंबा देणं, महाराष्ट्रातील उद्याचं राजकारण स्वच्छ करण्यासाठी ही महाविकास आघाडी एक महत्त्वाची कामगिरी करू शकेल याची खात्री लोकांना असल्यामुळे त्या रस्त्यानं जायचा निकाल हा आपण सर्वांनी घेतला पाहिजे, असं पवार म्हणाले.