• Mon. Nov 25th, 2024
    Mumbai News: विद्याविहार पुलाच्या कामाला गती, घाटकोपरमधील वाहतूक कोंडी लवकरच सुटणार

    म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: लालबहादूर शास्त्री मार्ग (एलबीएस) आणि रामकृष्ण चेंबूरकर मार्ग यांना जोडणाऱ्या विद्याविहार रेल्वे स्थानकाजवळील उड्डाणपुलाच्या कामाला गती मिळणार आहे. या पुलावर १०० मीटर लांबीचा पहिला गर्डर बसवण्याचे काम करण्यासाठी मुंबई महापालिकेने मध्य रेल्वेकडे मेगाब्लॉक जाहीर करण्याचा प्रस्ताव दिला आहे.

    विद्याविहार रेल्वे स्थानकानजीक (घाटकोपर दिशेला) असलेला आणि रेल्वे रुळांवरून जाणारा उड्डाणपूल जुना झाल्याने त्याची पुनर्बांधणी करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला. कल्याणमधील पत्रीपुलाप्रमाणेच या पुलाचे काम होणार असून, विनाखांब पूर्व आणि पश्चिमेला थेट जोडणारा हा पूल असेल. त्याचा आराखडा सन २०१६मध्ये तयार करण्यात आला होता. निविदांसह अन्य प्रक्रिया पूर्ण करून हा उड्डाणपूल २०२२पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा होती. त्यानंतर मे, २०२४ ही नवीन मुदत देण्यात आली. या कामाला आता गती देण्यात येत असून पुलावर ९९.३० मीटर लांबीचे दोन गर्डर बसवण्यात येणार आहे. पहिला गर्डर बसवण्यासाठी मेगाब्लॉक घ्यावा लागणार असून, त्यासाठी पालिकेने मध्य रेल्वेकडे प्रस्ताव पाठवला आहे. पहिला गर्डर बसवल्यानंतर दुसरा गर्डर बसवण्याचे काम सहा महिन्यांत केले जाईल. पुलाच्या पूर्व आणि पश्चिम बाजूचे व अन्य कामे मे, २०२४पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. रेल्वे रुळाच्या भागावरील पुलाची रुंदी २४.३० मीटर असून पुलाच्या दोन्ही बाजूला फूटपाथही असतील.

    पुणे, पिंपरी-चिंचवडमधील वाहतूक कोंडीवर उतारा, १३६ किमीचा रिंग रोड, पाच तालुके जोडणार

    असा होईल फायदा

    उड्डाणपुलामुळे विद्याविहार रेल्वे स्थानकाच्या आसपासच्या वाहतुकीत सुधारणा होईल. पूर्व-पश्चिम जोडणी सुधारण्यास आणि सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोड तसेच घाटकोपरजवळील उड्डाणपुलावरील वाहतूक सुरळीत होण्यास मदत होईल. पुलाच्या कामाचा एकूण खर्च हा १७८ कोटी रुपये आहे.

    जून २०२४मध्ये मुंबईकरांना मिळणार मोठं गिफ्ट, दक्षिण मुंबईतील वाहतूक कोंडी फुटणार, कोस्टल रोड…

    उड्डाणपुलाची रखडपट्टी

    रेल्वे मंत्रालयाच्या संशोधन डिझाइन आणि मानक संस्थेने (आरडीएसओ) पुलामध्ये बदल सुचविले होते. त्यामुळे रेल्वेच्या परवानगीने रेल्वे क्षेत्रातील आराखड्यात बदल करावा लागला. तसेच पुलाच्या पूर्व आणि पश्चिमेलाही काही बदल करावे लागल्याने आणि करोनाकाळातही काम पुढे सरकू न शकल्याने त्याची बांधणी रखडली.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *