राज्य सरकारने एसटी प्रवासात महिला आणि ६५ ते ७५ वयोगटातील ज्येष्ठ नागरिकांसाठी ५० टक्के सवलत लागू केली आहे. यानुसार प्रवास तिकीटादराचे निम्मे पैसे भरून प्रवास करणे शक्य आहे. एसटीच्या शिवाई, हिरकणी, रातराणी, लालपरी अशा सर्व गाड्यांतून रोज लाखो प्रवासी निम्या दरात प्रवास करत आहेत. ई-शिवनेरीसाठी निम्यापेक्षा अधिक रुपये का भरावे लागत आहेत, अशी विचारणा प्रवाशांकडून होत आहे.
शिवनेरीचा वेगवान प्रवास, विनाअपघात सेवा आणि दर्जेदार सुविधा यांमुळे एसटीच्या या श्रेणीकडे स्वतचा: प्रवासी वर्ग आहे. मुंबई-पुणे, ठाणे-पुणे रोज ये-जा करणारे प्रवासी शिवनेरीच्या प्रवासाला प्राधान्य देतात. एसटी महामंडळ पुनरुज्जीवन आराखड्यानुसार, एसटीचा परिचालन खर्च कमी करणे आणि प्रवासी गाड्या वाढवण्यासाठी पाचहजार १५० विद्युत बस एसटी महामंडळात दाखल होणार आहेत. यामुळे २०२६-२७ अखेर राज्यातील सर्वच एसटी मार्गांवर एसटीची ई-बस धावणार आहेत.
एसटी महामंडळाचे भाडे पाचच्या पटीत निश्चित करण्यात आलेले आहे. ई-शिवनेरीच्या वातानुकूलित प्रवासासाठी निम्मे भाडे अधिक वस्तू आणि सेवाकर (जीएसटी) आकारले जाते. यामुळे महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी अर्धे तिकीट २७५ रुपये आहे.
– शिवाजी जगताप, महाव्यवस्थापक, वाहतूक, एसटी महामंडळ
पहिल्या फेरीत ४२ हजारांचे उत्पन्न
ई-शिवनेरीची ‘ठाणे-पुणे-ठाणे’ या मार्गावरील पहिली फेरी सोमवारी पार पडली. तिला प्रवाशांचा उदंड प्रतिसाद लाभला. ठाणे-पुणे आणि पुणे-ठाणे दोन्ही मार्गांवर आसन क्षमतेचे संपूर्ण प्रवासी लाभले. ९८ प्रवाशांनी पहिल्या फेरीत प्रवास केला. यामुळे पहिल्या फेरीत शिवनेरीने ४२ हजार ७०५ रुपये असे उत्पन्न मिळवले.
ठाणे-पुणे ई-शिवनेरीचे भाडे (रुपये)
– सामान्य प्रवासी – ५१५
– महिला, ज्येष्ठ नागरिक – २७५
– ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक – मोफत