• Sat. Sep 21st, 2024
सभागृहात म्हणाले निर्णय आधीच ठरला होता, नंतर कोलांटउडी मारली, स्पष्टीकरण देता देता दादांची दमछाक

मुंबई : शरद पवारांच्या निवृत्तीचा निर्णय त्यांनी आधीच ठरवला होता. खरंतर महाराष्ट्रदिनी याची घोषणा होणार होती. पण मविआची सभा असल्याने ती घोषणा टाळली. नाहीतर दिवसभर टीव्हीवर तेवढंच दाखवला गेलं असतं आणि वेगळा मेसेज गेला असता, असं अजित पवार पहिल्यांदा म्हणाले. पण नंतर मी असं म्हणालोच नाही. आमदारांना महाराष्ट्रदिनी पुस्तक प्रकाशाच्या कार्यक्रमाला यायला जमणार नव्हतं, त्यामुळे आजची तारीख निवडली. साहेबांचा आजचा निर्णय एकालाही माहिती नव्हता, अशी कोलांटउडी अजित पवार यांनी मारली आणि सगळेच बुचकाळ्यात पडले.

शरद पवार यांच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर भावुक झालेल्या नेते कार्यकर्त्यांना अजित पवार यांनी समजाविण्याचा प्रयत्न केला. पण नेते कार्यकर्ते काही केल्या ऐकत नसल्याचं पाहून अजित पवार यांनी रौद्रावतार धारण केला. काही कार्यकर्त्यांना दटावलं तर नेत्यांना, भावुक होऊ नका, असं सांगताना कधी ना कधी हा निर्णय होणारच होता, नवा अध्यक्ष झाला तर बिघडलं कुठे? असा सवाल दादांनी नेत्यांना विचारलं. यादरम्यान शरद पवार यांचा निर्णय कधी ठरला होता याची इत्यंभूत माहितीच दादांनी बोलता बोलता देऊन टाकली.

“आपण एकटे आहोत. आता काय खरं नाही. आता राजीनामा दिल्याशिवाय काही गत्यंतर नाही, असं बोलून भावनिक होण्याचं काही कारण नाही. हा प्रसंग कधी ना कधी येणारच होता. कालच १ मे रोजी साहेब हा निर्णय जाहीर करणार होते, पण महाविकास आघाडीची सभा होती. मीडियात तेच चाललं असतं, म्हणून २ तारीख ठरली. त्यापद्धतीने साहेबांनी तो निर्णय जाहीर केलेला आहे. पण साहेबांच्या मनात ज्या गोष्टी आहेत, तेच आपण करु. साहेबांच्या मनातविरोधात यत्किंचितही काही गोष्ट होणार नाही. तुम्ही कुणीही कुठं बोलावलं तरी साहेब मार्गदर्शन करण्यासाठी येतील, हे साहेबांच्या साक्षीने मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो…”, असं सांगून एकप्रकारे आपल्याला हा निर्णय माहिती असल्याचंच अजित पवार यांनी दाखवून दिलं.

दोन तासांत कोलांटउडी, अजितदादांचा युटर्न…!

शरद पवार यांनी आपल्याला हा निर्णय सांगितला होता का? असा प्रश्न प्रसारमाध्यमांनी विचारल्यानंतर अजित पवार यांनी इन्कार करत साहेबांनी कुणालाच हा निर्णय सांगितला नव्हता, असं सांगितलं. त्यावर आपण मगाशी १ तारखेलाच ही घोषणा होणार होती, असं सांगितली, अशी आठवण पत्रकारांनी अजित पवार यांनी आपल्या म्हणण्यावरुन कोलांटउडी मारली. मी तसं म्हणालोच नव्हतं. काहीही चुकीचं बोलू नका. माझ्या म्हणण्याचा चुकीचा अर्थ काढला गेलाय. १ मे महाराष्ट्रदिनी आमदारांना ध्वजारोहन करण्याची संधी मिळते. तेव्हा त्यादिवशी जर कार्यक्रम ठेवला असता तर आमदारांना कार्यक्रमाला येणं शक्य झालं नसतं. त्यामुळे कार्यक्रम २ तारखेला ठेवला गेला, एवढंच मला सांगायचं होतं, अशी सारवासारव अजित पवार यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed