• Mon. Nov 25th, 2024
    चॅलेंज दिलं अन् अंगलट आलं, पॅनेलच पडला, संतोष बांगरांना कॉन्फिडन्स नडला!

    हिंगोली : संतोष बांगर… एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर प्रकाशझोतात आलेले आणि यापूर्वी अनेकवेळा आपली वादग्रस्त विधानं आणि आपल्या भूमिकांमुळे चर्चेत राहिलेले आमदार…. हिंगोली जिल्ह्यात आपणच शिवेसेनेचे सर्वेसर्वा आहोत असं दाखवण्याचा त्यांनी अनेकदा प्रयत्न केला. पण हेच बांगर पुन्हा एकदा चर्चेत आले ते बाजार समिती निवडणुकीत दिलेल्या मिशा कापण्याचं चॅलेंजमुळे…. कळमनुरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत नेमकं काय घडलं? कळमनुरी बाजार समितीसाठी बांगरांनी प्रतिष्ठा पणाला लावली पण त्यांच्याच होमग्राऊंडवर त्यांना कसा सपशेल पराभव स्वीकारावा लागला, वाचा….

    संतोष बांगर शिंदेंसोबत गेले तेव्हापासूनच वेगवेगळ्या कारणांमुळे वादात राहतात. आता बांगर वादात नाही, तर स्वतःच दिलेल्या चॅलेंजमुळे अडचणीत आलेत… बाजार समिती निवडणूक जर हरलो तर मी माझ्या मिशा कापेन असं चॅलेंज त्यांनी दिलं होतं आणि हेच चॅलेंज संतोष बांगरांच्या अंगलट आलंय.

    चॅलेंज दिलं अन् अंगलट आलं!

    कळमनुरी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये १७ जागांसाठी निवडणूक झाली. या निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध शिवसेना-भाजप युतीची लढत झाली. महाविकास आघाडी पुरस्कृत शेतकरी महाविकास पॅनलला १२ जागा मिळाल्या. तर शिवसेना-भाजप युतीच्या जय भवानी शेतकरी विकास पॅनलला ५ जागा मिळाल्या. या निवडणुकीत आमदार संतोष बांगर यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती मात्र अवघ्या ५ जागांवर समाधान मानत त्यांना सपशेल पराभव स्वीकारावा लागला.

    हिंगोली जिल्ह्यातील या बाजार समिती निवडणुकीत १७ पैकी १७ आमच्याच जागा निवडून येतील अन्यथा मिशी काढेन असं वक्तव्य आमदार संतोष बांगर यांनी केलं होतं. मात्र बांगर यांच्या फक्त ५ जागा निवडून आल्याने बांगरसाहेब आता मिशी काढणार का? असा सवाल नेटकरी करतायत. एकनाथ शिंदेंसोबत गेलेले लोक पक्के आहेत, बांगर नक्कीच मिशा काढतील, अशी मिश्कील टिपण्णी जयंत पाटील यांनी केलीये. तर ठाकरे गटाच्या अयोध्या पौळ यांनीही बांगर यांना डिवचलं. आपण २० रूपयं खर्च करून दाढी करायचं खोरं आणलंय. फक्त तुझ्यासाठी दादुड्या… कधी काढणार मिशा? काढ हा… असं म्हणत त्यांनी टोला लगावला आहे.

    शिवसैनिकच बंडखोरांना धडा शिकवतील याचा पुनरुच्चार उद्धव ठाकरेंनी अनेकदा केलाय.. शिवसेना सोडून गेलेल्या आमदार आणि खासदारांना त्यांच्याच मतदारसंघात सक्षम पर्याय पाहण्याची मोहिम शिवसेनेने सुरु केलीय. आता २०२४ साठी बांगरांना कोण आव्हान देतं हे पाहणं महत्त्वाचं आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *