महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल आल्यानंतर सरकार कोसळेल आणि अजित पवार भाजपच्या साथीने मुख्यमंत्री बनतील, अशा चर्चांना गेली १५ दिवस ऊत आला होता. आज त्याच चर्चांचं आणि अफवांचं मळभ अजित पवार यांनी दूर केलं. महाविकास आघाडीची संभाजीनगर, नागपूरनंतर आज तिसरी वज्रमूठ सभा राजधानी मुंबईत पाडतीये. तिन्ही पक्षांचे प्रमुख नेते सभेला उपस्थित आहेत. दादा सभेला येणार का? अशा चर्चा असतानाच दादांची सभेला एन्ट्री झाली. त्यावर खासदार संजय राऊत यांनीही कोटी केली. दादा सध्या लक्षवेधी आहेत. सभेला येणार… आपल्या भाषणाने सभा जिंकणार, असं राऊत म्हणाले. यावर अजितदादांनाही हसू अनावर झालं. त्यानंतर अजित पवार यांनी जोरदार भाषण केलं.
शेतकरी अडचणीत आहे. शेतकरी अवकाळीने पुरे हाल झाला आहे. अशा स्थितीत शेतकऱ्याला आधाराची गरज आहे. मात्र सरकार झोपेत आहे. कोरोनाच्या काळात आम्ही आर्थिक शिस्त पाळली. पण सध्या सरकार कोटींच्या जाहिराती देतायत, उधळपट्टी करतायेत. आताच्या सरकारमध्ये कंत्राटदारांची बिलं थकली, असा हल्लाबोल अजितदादांनी केला.
सध्याच्या सरकारच्या काळात राज्यात प्रचंड प्रमाणात गुन्हेगारी वाढली. कायदा सुव्यवस्थेचे तीनतेरा वाजलेत. या सरकारला सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही. यांना आता जागा दाखवण्याची वेळ आलीये, असा एल्गार करतानाच माझ्यासंबंधाने मीडियात काही चर्चा सुरु आहेत. पण त्या चर्चांमध्ये काहीही तथ्य नसल्याचं सांगत महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी त्यावर विश्वास ठेऊ नये, असं आवाहन अजितदादांनी केलं.
मविआला बाजार समितीत चांगलं यश मिळालं. हे सरकार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घ्यायला घाबरतंय. त्यांना हरण्याची भीती वाटतीये. मविआ एकदिलाने लढेल आणि सत्ताधाऱ्यांना त्यांची जागा दाखवेल, असा हुंकारही अजित पवार यांनी केला.