• Mon. Nov 25th, 2024

    स्वामी विवेकानंद यांच्याप्रमाणे नरेंद्र मोदी यांनी जगाचा भारताप्रती दृष्टिकोन बदलला – राज्यपाल रमेश बैस

    ByMH LIVE NEWS

    Apr 30, 2023
    स्वामी विवेकानंद यांच्याप्रमाणे नरेंद्र मोदी यांनी जगाचा भारताप्रती दृष्टिकोन बदलला – राज्यपाल रमेश बैस

    मुंबई, दि. 30 : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या कार्यकाळात एकाचवेळी अनेक क्रांतीकारी उपक्रमांची सुरुवात केली आहे. त्यांनी ४७.८ कोटी लोकांचे जनधन बँक खाती सुरु करून एक अभेद्य जागतिक विक्रम प्रस्थापित केला आहे. स्वामी विवेकानंद यांनी शिकागो येथील विश्वधर्म संमेलनातील भाषणातून जगाचा भारताकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला होता; त्याचप्रमाणे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, या दुसऱ्या नरेंद्र यांनी, जगाचा भारताकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला असून आपण भारतीय आहोत याचा प्रत्येकाला अभिमान वाटतो, असे उद्गार महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे काढले.

    प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या आकाशवाणीवरील ‘मन की बात’ या जनसंवादाच्या शंभराव्या भागाच्या सामुहिक प्रदर्शनानंतर राजभवन येथे झालेल्या कार्यक्रमात राज्यपाल श्री.बैस बोलत होते.

    यावेळी हिवरे बाजारचे माजी सरपंच पोपटराव पवार, मधुमेह विशेषज्ञ व कोविड टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी, ‘डिक्की’चे संस्थापक मिलिंद कांबळे, भरडधान्य उद्योजिका व प्रचारक शर्मिला ओस्वाल, राज्यातील अनेक पद्म पुरस्कार विजेते, ‘मन की बात’ कार्यक्रमांमध्ये पंतप्रधानांनी उल्लेख केलेले राज्यभरातील युवक, विद्यार्थी व नागरिक हे विशेष निमंत्रित म्हणून कार्यक्रमाला उपस्थित होते.

    यावेळी चित्रपट सृष्टीतील माधुरी दीक्षित, शाहिद कपूर, एकता कपूर, रोहित शेट्टी, सोनू निगम, प्रसाद ओक, शैलेश लोढा, अनुराधा पौडवाल आदी उपस्थित होते.

    भारत लोकसंख्येच्या दृष्टीने जगातील सर्वात मोठा देश झाला असल्याचे सांगून या लोकसंख्येचा देशाला फायदा व्हावा यादृष्टीने प्रधानमंत्र्यांनी युवकांच्या कौशल्य विकासासाठी स्किल, रिस्कील व अपस्कीलचा मंत्र दिला आहे, असे राज्यपालांनी सांगितले.

    ‘मन की बात’ चे प्रसारण दिनांक ३ ऑक्टोबर २०१४ रोजी पहिल्यांदा आकाशवाणीवरून झाल्यापासून प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी सदर कार्यक्रमातून जनसामान्यांच्या प्रश्नांवर चर्चा केली. स्वच्छ भारत, बेटी बचाओ – बेटी पढ़ाओ, पाण्याची बचत, स्थानिक उत्पादनांचा आग्रह, खादी, भारतीय खेळण्यांचा उद्योग, आरोग्य क्षेत्रातील स्टार्टअप्स, आयुष तसेच अंतराळातील प्रगती यासह अनेक विषयांवर मोदी यांनी ‘मन की बात’ मधून भाष्य केले. संवादात्मक शैलीमुळे ते ‘परीक्षेवर चर्चा’ कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थी व युवकांपर्यंत पोहोचले. ‘मन की बात’ ही खऱ्या अर्थाने लोकांची विकासाची चळवळ झाली आहे, असे सांगून ‘मन की बात’ चा शंभरावा भाग ही देशाच्या स्वातंत्र्याच्या शताब्दी वर्षाची सुरुवात असल्याचे राज्यपालांनी सांगितले.

    सुरुवातीला केंद्रीय संचार ब्युरो यांनी ‘मन की बात’ मधील भागांवर आधारित मांडलेल्या प्रदर्शनाला राज्यपालांनी  भेट दिली. यावेळी त्यांनी केंद्रीय प्रकाशन विभागाच्या पुस्तक दालनाला देखील भेट दिली.

    00000

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed