• Sat. Sep 21st, 2024
पाइपलाईनला हात लावला तर…; पुण्यात बायकोला जातीवाचक शिवीगाळ, नवऱ्याला गाडीत टाकून बेदम मारहाण

पुणे : पुण्यातील बारामतीमध्ये शेतामध्ये पाईप जोडण्यासाठी गेलेल्या शेतमजूर महिलेच्या पतीसह त्याच्या साथीदाराला दमदाटी करत महिलेचा विनयभंग करत तिला जातीवाचक शिवीगाळ केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकरणी हनुमंत नाझीरकर यांच्यासह चौघांविरोधात माळेगाव बुद्रूक पोलीस ठाण्यात विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत ३० वर्षीय विवाहितेने फिर्याद दिली आहे. गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये हनुमंत नाझीरकर, बापूराव कोकरे (रा. भिवाईमाळ, गायकवाडवस्ती, सोनकसवाडी, पणदरे), गणेश चव्हाण आणि उमेश चव्हाण (रा. ढाकाळे, ता. बारामती) यांचा समावेश आहे. दि. २५ रोजी सायंकाळी ५ वाजता पवारवाडी – ढाकाळे येथील शेतामध्ये ही घटना घडली. फिर्यादी या संध्याराणी खोमणे यांच्याकडे शेतमजूर म्हणून काम करतात. घटनेदिवशी त्यांच्या पतीसह अन्य मजूर आणि शेतमालक खोमणे शेतात उपस्थित होत्या.

चिमाजी आप्पांनी जिंकलेला ठाण्यातील ऐतिहासिक किल्ला नामशेष, पुरातत्व विभागाची धक्कादायक कबुली
शेततळ्यात पाणी येत नसल्याने त्या नाझीरकर यांच्या शेतात पाईपलाईन बघत जात असताना तेथे त्यांनी खोमणे यांच्या शेताकडे येणारा पाईप तोडून ते पाणी पाण्याच्या टाकीत जोडलेले दिसले. खोमणे यांनी “आमची पाईपलाईन परस्पर का तोडली”, अशी विचारणा केली असता आरोपींनी दमदाटी केली. “ही पाईपलाईन माझीच आहे. मी तोडीन अगर काहीही करीन तुमचा काय संबंध”, असं नाझीरकर बोलले. खोमणे यांनी सांगितल्यानुसार त्यांच्याकडील शेतमजूर ही पाईपलाईन जोडत असताना नाझीरकर आणि कोकरे यांनी फिर्यादीच्या पतीला जातीवाचक शिविगाळ केली. “पाईपलाईनला हात लावला तर पाय तोडून टाकीन”, अशी धमकी दिली. गणेश आणि उमेश चव्हाण यांनी फिर्यादीचा पती आणि अन्य एकाला मारहाण केली.

फिर्यादी सोडवण्यासाठी गेली असताना तिचा विनयभंग करण्यात आला. शेतमालकीन सोडवायला आल्या असता त्यांना देखील धक्काबुक्की करण्यात आली. “तू येथे शेती कशी करते तेच बघतो. तुझा ऊस मीच जाळला. माझे कोणीही काही करू शकत नाही”, असं म्हणत शिविगाळ दमदाटी करण्यात आली. वाहनाखाली चिरडून मारून टाकू अशी धमकी देण्यात आली. त्यानंतर फिर्यादीचा पती आणि अन्य एका मजूराच्या अंगावरील कपडे, मोबाईल काढून घेत त्यांना गाडीत घालून नेण्यात आले. सायंकाळी फिर्यादीचा पती घरी आल्यानंतर तिने विचारणा केली असता आरोपींनी गाडीत नेत बेदम मारहाण केली असल्याचे त्यांनी सांगितले. शेतमालकीन यांनी भावाची मदत घेत पोलीस ठाणे गाठले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

मालाड पश्चिमेतील वाहतूककोंडी फुटणार, रेल्वे स्थानक परिसरातील ज्वेलरी, फिश मार्केट भुईसपाट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed