उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस आणि खासदार अमोल कोल्हे यांनी राज ठाकरे यांना ‘लोकमत’च्या कार्यक्रमात विविध प्रश्न विचारुन अनेकानेक मुद्द्यांवर बोलतं केलं. राज ठाकरे यांनीही खुमासदार शैलीत प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न केला. यावेळी माझ्यातला ‘ठाकरे’ जागृत होतोय म्हणत दोन वेळा अमृता फडणवीसांची माफीही मागितली. मुलाखतीच्या शेवटाला अमृतांनी ‘रॅपिड फायर’ राऊंडमध्ये कोणत्या नेत्याला काय सल्ले द्याल? असं विचारल्यावर राज ठाकरे यांनी पहिल्यांदा डोक्याला हात लावला पण त्यांनी जसजशी नेत्यांची नावं घेतली, तसतशी राज यांनी फ्रंटफूटवर येऊन बॅटिंग केली.
ठाकरेंच्या सल्ल्यावर सभागृहात टाळ्या, अजितदादांचं एकसुरी उत्तर ऐकून कार्यकर्ते हसून लोटपोट
सध्य स्थितीत महाविकास आघाडी आहे पण निवडणुकीवेळी ती राहिलच हे सांगू शकत नाही, असं विधान करुन शरद पवार यांनी खळबळ उडवून दिली. तसेच राहुल गांधी यांनी अदानी प्रकरणावरुन देशात रान उठवलं, त्याचवेळी पवारांनी अदानीवरुन बोल लावू नका. जेपीसीची गरज नाही, अशी विधाने करुन राहुल गांधी यांच्या आरोपांमधील हवा काढून घेतली. शरद पवार यांच्या बदलत्या भूमिकांनी सगळ्या देशाचं लक्ष वेधून घेतलं. त्याचमुळे काकांकडेही लक्ष द्या, असा सल्ला राज यांनी अजित पवार यांना दिला. त्याच सल्ल्याला आता अजित पवार यांनी एका वाक्यात उत्तर दिलंय.
राज ठाकरे यांना सल्ला मी मनावर घेतो. जसे आपण आपल्या काकांकडे लक्ष ठेवले तसे मी पण माझ्या काकांकडे लक्ष ठेवीन, असा एकासुरात अजितदादांनी आपल्या खास स्टाईलने म्हटलं. राज ठाकरे यांच्या सल्ल्यावर जेवढ्या सभागृहात टाळ्या पडल्या, तेवढाच हास्यकल्लोळ अजितदादांचं एकसुरी उत्तर ऐकून त्यांच्या आजूबाजूला असलेल्या कार्यकर्त्यांनी केला.