कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला, बाजार समितीत सुद्धा घवघवीत यश मिळणार असल्याचा विश्वास
बिनविरोध निवडीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करून जल्लोष केला. या निवडीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा उत्साह दुणावला असून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला असेच घवघवीत यश प्राप्त होईल, असा विश्वास खडसे समर्थक कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.
१९८३ पासून शेतकी संघावर खडसेंच्या नेतृत्वात वर्चस्व कायम
बिनविरोध झालेले संपूर्ण संचालक हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहेत. एकनाथ खडसे यांचे या शेतकरी संघावर १९८३ पासून वर्चस्व कायम आहे. खडसे भाजपमध्ये असतानाही हा शेतकी संघ त्यांच्यात ताब्यात होता. विरोधात असलेल्या वेगवेगळ्या चार ते पाच संचालकामुळे अनेकदा निवडणूक सुद्धा झाली. मात्र याठिकाणी खडसेंच्या नेतृत्वात असलेल्या पॅनलचं वर्चस्व कायम आहे. त्यानंतर खडसे यांनी भाजप पक्ष सोडून राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला. त्यानंतरही शेतकी संघाच्या संचालक हे खडसेंच्या बाजूने आले. त्यांनीही राष्ट्रवादीत प्रवेश केला.
आता खडसे राष्ट्रवादीत असताना शेतकी संघाची ही पहिलीच निवडणूक झाली. यातही खडसेंचा करिष्मा कायम असल्याने सर्वच्या सर्व १५ जागांवर राष्ट्रवादीचे उमेदवार बिनविरोध निवडून आले. त्यामुळे खडसे भाजप मधून राष्ट्रवादीत गेल्यानंतर ही त्यांचे वर्चस्व कायम असल्याचे यातून सिध्द झाले आहे.
शेतकी संघ शेतकऱ्यांच्या विकासासाठी प्रयत्नशील : एकनाथ खडसे
मुक्ताईनगर शेतकी संघाचे ११०० सभासद आहेत. सर्व शेतकरी सभासदांनी शेतकरी पॅनलवर विश्वास दर्शवला आणि पंधरा उमेदवार मोठे संख्येने निवडून आले. सर्व संचालकांचं मनापासून अभिनंदन करतो. आगामी काळात शेतकी संघाच्या माध्यमातून शेतकरी मालासाठी अत्याधुनिक गोदाम तसेच इतर अत्यावश्यक सुविधा देण्याचा प्रयत्न राहिला, अशी प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी बोलताना दिली आहे.
यामध्ये जंगले प्रशांत प्रल्हाद, बढे चंद्रकांत विनायक, पाटील निवृत्ती भिका , महिला राखिव गटात चौधरी सुरेखा पुंजाजी, झांबरे अलका एकनाथ, इतर मागासवर्गीय मतदारसंघात झोपे प्रभाकर सोपान, अनुसूचित जाती मतदारसंघात भालशंकर प्रशांत (बाळा) प्रभाकर, भटक्या जाती जमाती मतदारसंघात, गोसावी मधुकर रामपुरी सर्व साधारण सहकारी मतदारसंघात बढे ज्ञानदेव लक्ष्मण गव्हाळ, शांताराम काशिनाथ दुट्टे , सोपान तुकाराम पाटील , गोपाळ चिंतामण पाटील, नरेंद्र मधुकर पाटील, दत्तू किसन कपले पुंडलिक शंकर, या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संचालकांची बिनविरोध निवड झाली आहे. या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक कार्यालयाचे काळे यांनी काम पाहिले. त्यांना गोकुळ पोहेकर यांनी सहकार्य केले.