चंद्रकांत पाटलांनी मी अजितदादांसाठी धावत पळत आलोय ते कुठे गायब झाले?, असे म्हणत अजित पवारांना चिमटा काढलाय. ते पुण्यातील शासकीय विश्रामगृह येथे कालवा बैठकीसाठी आले असता त्यांनी हे वक्तव्य केले आहे. आज (२६ एप्रिल) पुण्यातील शासकीय विश्रामगृहात विरोधी पक्षनेते अजित पवार आणि चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत कालवा समितीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. पाटील हे या बैठकीला आले. मात्र, गाडीतून उतरताच त्यांनी तेथील उपस्थित कार्यकर्त्यांना विचारले “अजितदादा आलेत का? दादांसाठी मी धावत पळत आलो आहे, आज ते कुठे गायब झाले..?” , चंद्रकांत पाटील गमतीने जरी म्हटले असले तरी त्याची राजकीय अर्थ काढले जात आहेत.
गेल्या काही दिवसांपासून अजित पवारांच्या प्रत्येक वक्तव्याची किंवा हालचालीची बातमी होत आहे. पवार हे भाजपच्या वाटेवर असून लवकरच ते मुख्यमंत्री होतील, अशा चर्चा रंगत असल्याने राजकीय मंडळी त्यांना चिमटे काढत आहेत. गेल्या काही दिवसांपासून अजित पवार हे भाजपच्या वाटेवर असून ते मुख्यमंत्री देखील होतील अशाही चर्चा रंगत आहेत. भावी मुख्यमंत्री म्हणून त्यांचे राज्यातील विविध शहरांमध्ये बॅनरही झळकत आहेत. मी जीवात जीव असेपर्यंत राष्ट्रवादी सोडणार नाही, असं अजित पवारांनी स्पष्टीकरण देऊनही चर्चा थांबायचं काही नाव घेत नाही. त्यातच भाजपच्या नेत्यांकडून अजित पवारांबद्दल अधिक संभ्रम निर्माण केला जात आहे. त्यापैकीच आत्ताच चंद्रकांतदादाचं हे वक्तव्य म्हणता येईल.
दरम्यान, भाजप नेत्यांसोबतच शिवसेना (शिंदे गट) नेत्यांकडून देखील अजित पवार हे भाजप किंवा शिवसेनेत आले तर त्यांचे स्वागत केले जाईल तर अजित पवारांनी दिलेल स्पष्टीकरण हे पूर्णविराम नसून स्वल्पविराम असल्यासही काही दिवसांपूर्वी उद्योग मंत्री उदय सामंत यांनी म्हटलं होतं. तर, त्यांनी आमच्या सोबत यावं अशी खुली ऑफर माजी आमदार विजय शिवतारे यांनी दिली होती. यामुळे अजित पवार खरंच भाजपच्या वाटेवर आहेत का? या चर्चा रंगत आहेत.
दुरीकडे आजच्या बैठकीत पुण्यावरची पाणीकपात तूर्तास टळली आहे. पुणेकरांची पाणीकपात १५ मे पर्यंत टळली असून १५ मे नंतर आढावा घेऊन पुढील निर्णय घेतला जाणार आहे. कालवा समिती बैठकीत पाणी नियोजनावर चर्चा झाली. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. या बैठकीत पुण्याच्या पाणी प्रश्नावर मोठा निर्णय झाला आहे.
विधानसभेत अजित पवारांनी घेतलेली चंद्रकांतदादांची हजेरी
काही दिवसांपूर्वी अर्थसंकल्पीय अधिवेशनात लक्षवेधी सुरु असताना अजित पवार यांनी सभागृहात गैरहजर राहणाऱ्या चंद्रकांत पाटील यांना खडे बोल सुनावले होते. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना रात्री दोन-अडीचपर्यंत जागून काम करायची सवय आहे. पण चंद्रकांत पाटील तर रात्री दोन-अडीचपर्यंत जागत नाहीत. त्यांनी तरी सकाळी लवकर उठून सभागृहात आले पाहिजे होते. ज्यांची लक्षवेधी होती त्या मंत्र्यांनीही सभागृहात उपस्थित राहिले पाहिजे होते. गैरहजर मंत्र्यांपैकी कोणालाही विधिमंडळाच्या कामकाजात रस नाही. यांना बाकीच्याच कामांमध्ये रस आहे. आम्हाला बोलण्याची वेळ का येते? निर्ल्लजपणाचा कळस गाठला गेला की आमचाही नाईलाज होतो, असे अजित पवार यांनी म्हटले होते.
चंद्रकांत पाटील पुणेकर नाहीत, कोल्हापुरला पार्सल पाठवायचंय – धंगेकर