• Mon. Nov 25th, 2024

    भारती विद्यापीठाने नवीन शैक्षणिक धोरणानुसार शिक्षण द्यावे- उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

    ByMH LIVE NEWS

    Apr 26, 2023
    भारती विद्यापीठाने नवीन शैक्षणिक धोरणानुसार शिक्षण द्यावे- उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

    पुणे, दि. २६: भारती विद्यापीठाने नवीन शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांना व्यवसायाभिमुख, व्यवहारात उपयोगी पडणारे, रोजगारक्षम, संशोधनवृत्तीला चालना देणारे शिक्षण द्यावे, असे आवाहन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

    भारती विद्यापीठाच्या २८ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेचे उपाध्यक्ष डॉ. अभय जेरे, भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाचे कुलपती डॉ. शिवाजीराव कदम, भारती विद्यापीठाचे कार्यवाह तथा आमदार डॉ.विश्वजीत कदम, कुलगुरु डॉ. विवेक सावजी, कार्यकारी संचालिका डॉ. अस्मिता जगताप, कार्याध्यक्ष आनंद पाटील, माजी आमदार उल्हास पवार आदी उपस्थित होते.

    श्री. पाटील म्हणाले, नवीन शैक्षणिक धोरणात  माणूस घडविणारे आणि भविष्याचा वेध घेण्याची ताकत निर्माण करणे, नैतिक शिक्षणाबरोबर संशोधनावर भर देणे यासारख्या बाबींचा समावेश करण्यात आला आहे.  भारती विद्यापीठात मोठ्याप्रमाणात पायाभूत सुविधा असून या सुविधेचा उपयोग करुन विद्यार्थ्यांच्या संसोधनवृत्तीला चालना देण्यासाठी नाविन्यपूर्ण शिक्षण देण्याचे कार्य करावे. संरक्षण क्षेत्रासह अन्य विविध क्षेत्रात निर्यातीच्या संधी उपलब्ध होत असल्याचे त्यांनी सांगितले.

    शांतीलाल  मुथा आणि जयसिंगराव पवार यांनी त्यांच्या क्षेत्रात मौलिक कार्य केल्याचेही मंत्री पाटील म्हणाले.

    स्व.पतंगराव कदम यांनी स्वतःच्या हिमतीवर शून्यातून विश्व निर्माण केले. त्यांनी १२ शहरात ८८ संस्था, १८० शाखा, ९९ शाळा स्थापन केल्या त्यामध्ये असून सुमारे ४७ हजारपेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. राजकरणापलीकडे जाऊन त्यांनी सर्वांशी मैत्रीपूर्ण संबंध जपले. राजकारणासह त्यांनी शैक्षणिक क्षेत्रातही रचनात्मक काम केल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.

    श्री. कदम म्हणाले, भारती विद्यापीठ सामाजिक बांधिलकी मानणारी एक शैक्षणिक संस्था आहे. विद्यापिठातून शिक्षण घेतलेले विद्यार्थी देश विदेशात कार्यरत आहेत याचा  अभिमान आहे. भारती विद्यापीठाची ओळख उच्च शिक्षण देणारी संस्था म्हणून असून विविध शाखेतून उच्च शिक्षण देण्याचे काम करीत आहेत.

    भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालय जीवनसाधना गौरव पुरस्काराचे वितरण

    पालकमंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते शांतीलाल मुथा फाउंडेशन आणि भारतीय जैन संघटनेचे संस्थापक शांतीलाल मुथा आणि ज्येष्ठ इतिहास संशोधक जयसिंगराव पवार यांना भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालय जीवनसाधना गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.

    यावेळी श्री . मुथा आणि श्री. पवार यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कुलगुरु डॉ. सावजी यांनी केले.

    ०००००

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *