• Sat. Sep 21st, 2024

अवकाळीचे संकट कायम, आज ठाणे, मुंबई, पालघरमध्ये मेघगर्जनेसह पावसाचा इशारा, दोन दिवस महत्त्वाचे

अवकाळीचे संकट कायम, आज ठाणे, मुंबई, पालघरमध्ये मेघगर्जनेसह पावसाचा इशारा, दोन दिवस महत्त्वाचे

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईःअवकाळी पावसाने एप्रिलमध्ये अजूनही विश्रांती घेतलेली नाही. मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यांमध्ये आज, बुधवारी मेघगर्जनेसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. गेल्या आठवड्यातील पावसानंतर गेले दोन दिवस पुन्हा प्रचंड उकाडा जाणवत होता. त्यात आता पुन्हा मुंबईत पावसाचा इशारा देण्यात आल्याने उकाड्यापासून एखाद-दुसरा दिवस दिलासा मिळेल, अशी शक्यता आहे. मात्र, एप्रिलमध्ये असा अवकाळी पाऊस पडल्यानंतर पावसाळ्यामध्ये नेमका कसा पाऊस अनुभवावा लागणार आहे, असे प्रश्न उपस्थित होत आहेत.मुंबई, पालघर येथे बुधवारी, तर पालघर येथे गुरुवारीही मेघगर्जनेसह तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर गुरुवारी ठाणे आणि मुंबई येथे पावसाच्या हलक्या सरींची शक्यता आहे. रायगड आणि रत्नागिरी येथेही बुधवारी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असून, गुरुवारी हलक्या पावसाचा अंदाज आहे. सिंधुदुर्गात मात्र त्या मानाने दोन दिवस फारसा पाऊस नसेल. मुंबईमध्ये मंगळवारी सांताक्रूझ येथे ३३ अंश सेल्सिअस, तर कुलाबा येथे ३३.२ अंश सेल्सिअस कमाल तापमान होते. मात्र वातावरणात आर्द्रता असल्याने तापमानाच्या तुलनेत अधिक उकाड्याची जाणीव मुंबईकरांनी अनुभवली. कुलाबा येथे मंगळवारी ७४ टक्के तर सांताक्रूझ येथे ६८ टक्के सापेक्ष आर्द्रता होती.

उत्तर मध्य महाराष्ट्रात धुळे, नंदुरबार, जळगाव येथे शनिवारपर्यंत तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. नाशिक, अहमदनगर, पुणे येथे बुधवार आणि गुरुवारसाठी ऑरेंज अॅलर्ट देण्यात आला आहे. त्यानंतरही शनिवारपर्यंत अहमदनगर आणि पुणे येथे मेघगर्जनेसह पावसाची शक्यता कायम आहे. नाशिक व्यतिरिक्त सातारा, औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, हिंगोली, अमरावती, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ येथेही बुधवारसाठी ऑरेंज अॅलर्ट देण्यात आला आहे. विदर्भ, मराठवाड्यात या आठवड्यात सातत्यपूर्ण पाऊस आहे. परभणी, हिंगोली, नांदेड येथे गुरुवारीही ऑरेंज अॅलर्ट कायम आहे. विदर्भात अवकाळीची तीव्रता अधिक असून गारपीटीचीही वर्तवण्यात आली आहे. मराठवाड्यातही बुधवार आणि गुरुवारी गारपीटीची शक्यता आहे अशी माहिती हवामान विभागाचे निवृत्त अधिकारी माणिकराव खुळे यांनी दिली.

सध्या रांची ते मदुराईपर्यंत वारा खंडितता प्रणाली टिकून आहे. मान्सून पूर्व काळामध्ये जी सर्वसाधारण वारा खंडितता प्रणाली अपेक्षित असते, तशी यंदा ८ मार्चपासून आढळेली नाही. सर्वसाधारणपणे ही प्रणाली पूर्व किनारपट्टीला समांतर भूभागावर झारखंड ते दक्षिण चेन्नईपर्यंत असतो. यंदा ही प्रणाली दक्षिणोत्तर स्थितीत उत्तर महाराष्ट्र ते दक्षिण चेन्नईपर्यंत दोलायनात फिरत राहिली. त्यामुळे दक्षिण द्वीपकल्प भागात हवेचे उच्च दाब क्षेत्र समुद्रात दोन्ही बाजूला टिकून राहिले तर जमिनीवर वारा खंडितता प्रणाली यामुळे अवकाळी वातावरण सातत्यपूर्ण राहिले अशी माहिती खुळे यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed