• Sat. Sep 21st, 2024

सीएसएमटीवरुन २४ डब्ब्यांच्या मेल- एक्स्प्रेससाठी फलाट उपलब्ध होणार, गाड्यांची क्षमता वाढणार

सीएसएमटीवरुन २४ डब्ब्यांच्या मेल- एक्स्प्रेससाठी फलाट उपलब्ध होणार, गाड्यांची क्षमता वाढणार

म. टा. प्रतिनिधी, मुंबईःछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून २४ डब्यांच्या मेल-एक्स्प्रेसाठी आता फलाट उपलब्ध होणार आहे. सीएसएमटीमधील फलाट क्रमांक १०-११च्या विस्तारीकरणाचे सुरू असलेले काम सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार आहे. यामुळे २४ डब्यांच्या रेल्वेगाड्यांमुळे प्रतिमेल-एक्स्प्रेसची आसनक्षमता ८००ने वाढणार आहे.सीएसएमटीमध्ये पायाभूत सुविधा उभारण्याचे काम हाती घेताना लोकलसह अन्य रेल्वे वाहतुकीवर त्याचा परिणाम होतो. यामुळे अनेक वर्षांपासून फलाट विस्तारीकरणाचा प्रकल्प रखडला होता. मुंबई विभाग आणि मध्य रेल्वे मुख्यालय यांतील वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांनी एकत्र येऊन हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी साचेबद्ध नियोजन सुरू केले. रेल्वे वाहतूक अबाधित ठेवण्यासाठी पहिल्या टप्प्यात फलाट क्रमांक १०-११ आणि दुसऱ्या टप्प्यात फलाट क्रमांक १२-१३ यांचे विस्तारीकरण करण्यात येणार आहे. पहिल्या टप्यातील कामाचा शेवटचा टप्पा सुरू असून सप्टेंबरपर्यंत काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे. यामुळे सीएसएमटीपर्यंत येणाऱ्या काही रेल्वेगाड्या दादर स्थानकापर्यंत चालवण्यात येणार आहेत. सप्टेंबरपर्यंत गाड्यांच्या थांब्यात बदल राहणार आहे. येत्या दिवाळीत सीएसएमटीहून २४ डब्यांच्या अतिरिक्त फेऱ्या चालवण्याचे नियोजन आहे, असे वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.

विस्तारीकरणात येणारी कामे

– फलाट विस्तार करण्यासाठी ६१ ओव्हरहेड वायरचे खांब आणि ७१ सिग्नल अन्य ठिकाणी नेण्यात येत आहेत

– विस्तारात अडथळा असलेली नऊ लहान-मोठी बांधकामे हटविण्यात येत आहेत

– बांधकाम पाडल्यानंतर, राडारोडा हटवणे आणि बांधकाम करण्यासाठी साहित्य क्रेन, टेम्पो त्या ठिकाणी पोहोचवणे

– मुंबई लोकल, मेल-एक्स्प्रेस वाहतूक अबाधित ठेवून फलाट विस्तारीकरणाचे काम करणे

………- सीएसएमटीमध्ये उभे करण्यात येणारे डबे वाडीबंदर यार्डात नेण्यात आले. आवश्यकतेनुसार हे डबे सीएसएमटीमध्ये आणून रेल्वेगाड्यांना जोडण्यात येतात.

रोज १० फेऱ्या, ८४० वाढीव आसने

सध्या चार फलाटांवर प्रत्येकी १७-१८ डब्यांच्या मेल-एक्स्प्रेस थांबतात. विस्तारीकरणानंतर सहा-सात डबे जोडण्यात येतील. एका डब्याची सरासरी आसनक्षमता ७० असते. यामुळे प्रतिफेरीमागे सुमारे ८४० आसने प्रवाशांना उपलब्ध होणार आहेत. अतिरिक्त फलाटांमुळे रोज १० वाढीव फेऱ्या चालवणे शक्य आहे, असा रेल्वेचा दावा आहे. सध्या फलाट क्रमांक १५ ते १८ यांवर २४ डब्यांच्या मेल-एक्स्प्रेससाठी जागा उपलब्ध आहे. विस्तारीकरणानंतर आणखी दोन फलाट उपलब्ध होणार आहेत. यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात सीएसएमटीतील फलाट विस्तारीकरणासाठी ६० कोटी निधीची तरतूद करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed