दरम्यान, या कुस्तीगीरांनी न्यायालयात सादर केलेल्या काही व्हिडीओ क्लिप बृजभूषण यांच्याविरुद्धचा सर्वांत मोठा पुरावा ठरतील, असे सांगितले जात आहे. तर दुसरीकडे जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक, हरयाणाचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते भूपिंदर सिंग हुड्डा यांनी कुस्तीगीरांना पाठिंबा दिला असून, ही यादी वाढत आहे. तसेच माजी केंद्रीय मंत्री कपिल सिब्बलही कुस्तीगीरांच्या समर्थनार्थ पुढे आले आहेत. ‘इन्साफ के सिपाही तुमच्या पाठीशी आहेत’, असे सिब्बल यांनी खेळाडूंना सांगितले. कुस्तीगीरांच्या समर्थनासाठी खाप पंचायतीचे सदस्य आणि शेतकरीही उतरले असून, सोनीपत येथील शेतकरी दिल्लीकडे निघाले आहेत. आरोपींवर कारवाई होईपर्यंत आम्ही परत येणार नाही, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.
या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने याप्रकरणी आणखी एक समिती नेमण्याची घोषणा सोमवारी केली. मात्र, कुस्तीगीरांनी ती अमान्य केली. ‘आमचे आरोप साधार असताना आमच्याकडे बृजभूषण यांच्या लैंगिक शोषणाचे कोणते व कसले पुरावे सरकार मागत आहे,’ असा संतप्त प्रश्न कुस्तीगीरांनी केला आहे.
मेरी कोम निरीक्षण समितीच्या सदस्य कुस्तीपटू बबिता फोगट यांनीही मंगळवारी जंतर-मंतरवर येऊन कुस्तीगीरांना पाठिंबा दिला, तेव्हा साक्षी मलिक, विनेश फोगट यांच्यासह अनेक पदकविजेत्या कुस्तीगीरांना अश्रू अनावर झाले. ‘तपास योग्य पद्धतीने झाला नाही आणि मला अहवालही वाचायला दिला नाही,’ अशी पोलखोल फोगट यांनी केली. ‘माझ्या अनेक मुद्द्यांकडे दुर्लक्ष केले असून, त्या अहवालात मी माझा आक्षेप नोंदवला आहे,’ असेही त्यांनी सांगितले.
विनेशने पत्रकारांना सांगितले की, मी तुम्हाला अशा हजारो मुलींची नावे सांगू शकते. मी जितका आकडा सांगेन तो कमीच आहे. बृजभूषण यांच्या अत्याचाराने, त्रासाने कुस्ती क्षेत्रात देशासाठी खेळण्याची इच्छा असलेली एकही मुलगी सुटली नसेल, असेही विनेश म्हणाली. तर ही केवळ कुस्तीगीरांची लढाई नाही, कारण देशात अशा प्रकारचे शोषण प्रत्येक खेळात होते. त्यामुळे इतर सर्व क्रीडापटूंचाही पाठिंबा आपल्याला अपेक्षित असल्याचे बजरंग पुनिया याने सांगितले.
प्रतीक्षा बागडी महाराष्ट्राची पहिली महिला महाराष्ट्र केसरी