कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक ज्या दिवशी जाहीर झाली. त्यावेळीच पक्षाकडून निकम यांना उमेदवारी नाकारण्यात आली होती. मात्र, निकम यांनी आपली भूमिका मांडत आपण अपक्ष निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले. पक्षाच्या सर्व मी कारभारात सहभागी होतो. मात्र, मलाच उमेदवारी का नाकरण्यात आली असा सवाल करत निकम यांनी मनातील खंत बोलून दाखवली होती.
देवदत्त निकम हे वळसे पाटील यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यांना आतापर्यंत पक्षकडून अनेक पदांवर संधी देण्यात आली आहे. देवदत्त निकम हे बाजार समितीचे माजी सभापती आहेत. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी देशातील पहिली डिजिटल बाजार समिती म्हणून मंचर कृषी समितीला नाव मिळवून दिलं. तसेच सहा वर्ष शेतकऱ्यांसाठी काम केले आहे. त्यांनी अर्ज माघारी घेण्यासंदर्भात वळसे पाटील यांच्याशी चर्चा करून आपण अर्ज माघारी घेणार नसल्याचे सांगितले होते. पक्षाने तुम्हाला कळवतो असे सांगितले होते. मात्र पक्षाकडून कोणतीही हालचाल झालेली दिसली नाही. त्यामुळे निकम यांनी बंडखोरी केल्याची चर्चा सुरू झाली आहे.
१९९० पासून देवदत्त निकम हे वळसे पाटील यांच्यासोबत काम करत आहेत. आतापर्यंत त्यांनी निष्ठेने काम केले आहे. देवदत निकम यांनी बंडखोरी करण्यामागच्या चर्चांना आता उधाण आले आहे. देवदत्त निकम हे आमदारकीसाठी इच्छुक असून त्यांनी ही बंडखोरी करत असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यामुळे देवदत्त निकम यांच्या बंडखोरीचा राष्ट्रवादीला आणि वळसे पाटील यांना फटका बसणार का? हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे.