ही बाब पोलीस प्रशासनाला निदर्शनास आणूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात होते. त्यामुळे काल दुपारी आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी “हिडन कॅफे”त जाऊन तोडफोड केली. अचानक परिसरात झालेल्या तोडफोडीमुळे मोठ्या प्रमाणात हिडन कॅफेसमोर नागरिकांची गर्दी झाली. याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत.
याबाबत शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर कॅफेमध्ये अल्पवयीन मुलीसोबत अश्लील चाळे सुरू होते. या प्रकरणी पोलिसांनी छापा टाकून दोन अल्पवयीन मुलींसह चौघांना ताब्यात घेतलं आहे. सातारा शहर पोलिस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
एमआयडीसीतील “हिडन कॅफे”मध्ये तरुण-तरुणींचे अश्लील चाळे सुरू असल्याची माहिती सातारा शहर पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी महिला अधिकारी कर्मचाऱ्यांसह तेथे छापा टाकला. त्यावेळी पोलिसांनी संबंधितांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले. त्यांची चौकशी केल्यानंतर त्यांच्या पालकांनाही याची माहिती देण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी कॅफे मालक आशुतोष माने, चालक विक्रम निकमसह दोन तरुणांवर काल शुक्रवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा पोलीस उपनिरीक्षक वाघमोडे तपास करत आहेत.
दरम्यान, आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी हिडन कॅफेत जाऊन तोडफोड केल्याची माहिती देण्यास पोलिसांनी असमर्थता दर्शवली.