याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, बाबू मारुती नाळे यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यात म्हटले आहे की, चुलत भाऊ प्रशांत पाडुरंग नाळे हे त्यांच्या ताब्यातील बजाज पल्सर मोटारसायकल ( MH-11 CB 5805) घेऊन मामाला भेटून पांढरवाडीहून फलटणकडे येत असताना त्यांचा बिजवडी येथे मराठी शाळेच्या अलिकडे पुलाला जोरात धडक होऊन अपघात झाला. त्यात ते गंभीर जखमी झाले.
त्यांना उपचारासाठी फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारापूर्वी त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. याबाबतची कागदपत्र फलटण शहर पोलीस ठाण्यातून दहिवडी पोलीस ठाण्यात आज टपालाने मिळाल्यानंतर या घटनेची नोंद शनिवारी दुपारी दीड वाजता दहिवडी पोलीस ठाण्यात झाली आहे. या अपघाताचा तपास पोलीस नाईक आर. पी. खाडे करीत आहेत.
प्रशांत नाळे हे पांढरवाडी ( खटाव ) येथे मामांना भेटायला गेले होते. तेथून परतत असताना बिजवडी येथे अपघातात त्यांचा मृत्यू झाला. ते आज, शनिवारी जम्मू येथे नियुक्तीच्या ठिकाणी जाण्यासाठी रवाना होणार होते. मात्र, अक्षय तृतीयेच्या आदल्या दिवशी ही घटना घडल्याने दुधेबावी व परिसरात शोककळा पसरली. फलटण येथे शवविच्छेदनानंतर त्यांच्या पार्थिव फुलांनी सजविलेल्या ट्रॉलीतून अंत्यसंस्कारासाठी नेण्यात आले.
यावेळी प्रशांत नाळे अमर रहेच्या घोषणाही देण्यात आल्या. त्यांच्या मृत्यूची बातमी परिवारास समजताच त्यांची आई, वडील, भाऊ, पत्नी व त्यांचा दोन वर्षाचा मुलगा यांचा आक्रोश पाहून अनेकांची मने हेलावली. अनेकांना अश्रू अनावर झाले होते.
