‘विरोधकांवर केंद्र सरकार सत्तेचा गैरवापर करीत आहे. खोटे गुन्हे नोंदवून विरोधकांना नाउमेद करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न होत आहे. यामुळे कोणावरही अन्याय झाला, तर त्याच्यामागे ताकदीने उभे राहिले पाहिजे. त्या प्रवृत्तीच्या विरोधात लढण्यासाठी कोणतीही किंमत द्यावी लागली, तरी चालेल’, असे सांगत शरद पवार यांनी केंद्राच्या धोरणावर टीका केली. राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख, नवाब मलिक, एकनाथ खडसे यांचे जावई आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावरील कारवाईचे उदाहरण देत शरद पवार यांनी खारघरच्या घटनेवर प्रथमच भाष्य केले.
‘देशात सत्तेचा गैरवापर मोठ्या प्रमाणात सुरू आहे. दोन मुलांचे भांडण झाले, तरी एक जण दुसऱ्याला ईडी मागे लावेन, अशी धमकी देतो; इतकी ही व्यवस्था घराघरात पोहोचली आहे. अनिल देशमुख यांच्यावर खटला भरण्यात आला. त्यांच्यावर १०० कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा आरोप होता. आरोपपत्र दाखल झाल्यानंतर यात सव्वा कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला असून, त्यांच्या शिक्षणव्यवस्थेला एक कोटी रुपयांची देणगी देण्यात आल्यामुळे खटला दाखल केल्याचे म्हटले आहे. आता भूमिका घेऊन जर कोणी पुढे येत असेल, तर त्यांच्यावर कारवाई केली जाते. नवाब मलिक यांचा खटला किती दिवस पुढे ढकलला जात आहे. राष्ट्रीय पक्षाचा प्रवक्ता आहे म्हणून त्यांना तुरुंगात टाकण्यात आले’, असे पवार म्हणाले. ‘सगळी उदाहरणे एकच सांगतात की, आम्ही सत्तेचा गैरवापर करणार. आमच्या विरोधातील मत मान्य नसेल, त्याच्यावर कारवाई करणार. हे राज्य आणि हा देश आम्ही म्हणणार तशाच पद्धतीने चालला पाहिजे, ही भूमिका घेऊन आज देशाचे राजकारण एका वेगळ्या दिशेला नेत आहेत’, असे शरद पवार म्हणाले. या शिबिरात राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आदींची भाषणे झाली.
‘राजकारणासाठीच बेफिकिरी’
‘प्रचंड उन्हाळा, उष्माघाताची शक्यता असतानाही एवढा मोठा कार्यक्रम उघड्यावर घेतला जातो. याचा अर्थ त्यांना प्रचंड जनशक्ती जमवून आगामी काळात होणाऱ्या निवडणुकांसाठी राजकारणाला अनुकूल वातावरण तयार करायचे होते. त्यामुळेच बेफिकिरी दाखवली गेली. त्याची किंमत काही निष्पाप लोकांना चुकवावी लागली’, असे शरद पवार म्हणाले.