‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरणावेळी झालेल्या १३ मृत्यूंच्या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेवर राज ठाकरे यांनीही भाष्य केले होते. त्यावर संजय राऊत यांनी नाव न घेता राज हे भाजपचा पोपट असल्याची टीका केली. त्याबाबत विचारले असता, ‘राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांचे कौतुक केल्यावर राऊत यांचा आनंद गगनात मावेनासा होतो. उद्धव ठाकरे यांच्या कामावर टीका केल्यावर ते भाजपाचे पोपट होतात. राज ठाकरे स्पष्टवक्ते आहेत. ते आमचे मित्र असले, तरी आमचे चुकल्यावर सडकून टीका करण्यास मागेपुढे पाहत नाहीत. त्यामुळे राज हे भाजपचे पोपट होऊ शकतात का,’ असा प्रश्नही बावनकुळे यांनी केला.
‘विचारधारा मान्य करणारास प्रवेश’
कुख्यात गुंड शरद मोहोळ याची पत्नी स्वाती यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यावरून भाजपवर टीका होत आहे. याबाबत विचारले असता, ‘कालच्या पक्षप्रवेशाबाबत मला माहिती नाही. एखाद्या कार्यकर्त्याबाबत भूतकाळात काय घडले, त्याबद्दल आमचे फार काही मत नाही. आमच्या पक्षाची विचारधारा, शिस्त जो आत्मसात करायला तयार असेल, त्याला आम्ही पक्षप्रवेश नाकारत नाही,’ असेही ते म्हणाले. राजकीय, अराजकीय क्षेत्रांतून अनेक जण भाजपमध्ये येण्यास उत्सुक आहेत. त्यासाठी आम्ही मंगळवार हा दिवस निवडला आहे. येत्या मंगळवारी आणि यापुढे दर मंगळवारी पक्षाच्या प्रदेश कार्यालयात पक्षाला साजेसे पक्षप्रवेश होतील, अशी माहिती त्यांनी दिली.
‘पुण्याबाबत चर्चा नको’
‘खासदार गिरीश बापट यांचे नुकतेच निधन झाले आहे. अद्याप पोटनिवडणुकीची घोषणाही झालेली नाही. ही पोटनिवडणूक होईल की नाही, हेदेखील माहिती नाही. त्यामुळे त्यावर आताच भाष्य करणे योग्य नाही,’ असे ते म्हणाले. कसब्यातील पराभवाचे विश्लेषण केले पाहिजे. १० वर्षांपूर्वीच्या भूमिकेत शिरून आपण पुन्हा पुणे शहर पिंजून काढले पाहिजे. आपल्याला कसब्यातील पराभवाचा वचपा घ्यायचा आहे, हे लक्षात ठेवा. नागपूरएवढेच आपण पुण्यालाही महत्त्व देऊ, असा शब्द मी देवेंद्र फडणवीसांना दिला आहे, असे त्यांनी सांगितले.