शिर्डी साई संस्थानच्या बँकांतील ठेवींच्या आलेखा बरोबरच दानात आलेल्या नाण्यांचा बँकेकडील साठाही वाढतो आहे. नाण्यांच्या समस्येने शिर्डीतील सर्वच राष्ट्रीयीकृत बँका मेटाकुटीला आल्या आहेत. चार बँकानी तर नाण्यांच्या धास्तीने संस्थानच्या ठेवीच्या मोहावरही पाणी सोडले आहे.
यामुळे संस्थान लवकरच जिल्ह्यातील अन्य बँकांमध्ये खाते उघडणार आहे. शिर्डीतील डझन भर व नाशिकच्या एका राष्ट्रीयीकृत बँकेत संस्थानचे खाते आहे. यात २६०० कोटींच्या ठेवी आहेत. साई संस्थान आठवड्यातून दोनदा दान स्वरुपात आलेल्या देणगीची मोजदाद करते. प्रत्येक वेळी वेगवेगळ्या बँकेला निमंत्रित करण्यात येते. दानात निघालेले पैसे व नाणी मोजून बँक घेऊन जाते. ही रक्कम बँकेत बचत व ठेवीच्या रूपात ठेवण्यात येते. प्रत्येक बँकेकडे शिर्डी संस्थानकडून आलेली सरासरी दीड दोन कोटींची नाणी साचली आहेत.
वर्षाला जमा होतात साडेतीन कोटींची नाणी
साईंच्या झोळीत आलेल्या नाण्यांची आठवड्यातून दोनवेळा मोजदाद होते. आठवड्यात जवळपास ४ लाख रुपयांची नाणी जमा होतात. त्यानुसार एक वर्षाला साधारपणे साडेतीन कोटी रुपये जमा होतात.
छत कोसळण्याची भीती
शिर्डीत छत्रपती कॉम्प्लेक्समधे कॅनरा बँक पहिल्या मजल्यावर आहे. छतापर्यंत नाण्याने गच्च भरलेल्या पिशव्या नेताना कर्मचाऱ्यांची दमछाक होते. बँकेच्या स्ट्राँगरूममध्ये किमान तीन ट्रक नाणी असतील. या अवजड नाण्यांमुळे दुकानदारांना छत कोसळण्याची भीती वाटत आहे. साईंच्या झोळीत येणाऱ्या नाण्यांचा दान मोठ्या स्वरूपात आहे. ही रक्कम साईबाबा संस्थान विविध बँकांच्या खात्यामध्ये जमा करतात. परंतु या नाण्यांची संख्या जास्त असल्याने बँका स्वीकारण्यास असमर्थता दाखवत आहेत. त्यामुळे आम्ही इतर बँकांच्या शाखेमध्ये नवीन खाते उघडणार आहोत आणि या नाण्यांचा नियोजन करण्यासाठी आरबीआयने देखील आम्हाला मदत करावी, अशी मागणी साईबाबा संस्थानचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव यांनी केली आहे.
खिचडी, शेंगदाण्याचं झिरकं; महाशिवरात्रीनिमित्त शिर्डीत साडेपाच हजार किलो साबुदाण्याचा महाप्रसाद