गंभीर जखमा किंवा अन्य कारणांनी तब्बल आणखी ४५ जनावरांनी प्राण सोडले. त्यामुळे दोन दिवसात मृत्यू झालेल्या जनावरांचा आकडा ६६ वर पोहोचला आहे, तर ३६ जनावरांची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी अमानुष पद्धतीने वाहतूक करणाऱ्या वाहन चालक व मालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोवंशाची तस्करी करणारे मोठे रॅकेट सक्रिय असल्याचा अंदाज या पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र एकाच वेळी ६६ जनावरांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. कठोरातील कठोर कारवाई करत आरोपींना कडक शिक्षा करण्यात यावी अशी मागणी होत आहे.
बीड जिल्ह्यात गेल्या सहा ते सात महिन्यांमध्ये गोवंश जातीच्या जनावरांची तस्करी करणाऱ्या अनेक गाड्या टेम्पो या पोलीस प्रशासनाने पकडून त्यांना जीवदान दिले. आष्टी शहरातून एका टेम्पोमधून काही जनावरे कत्तलीसाठी नेली जात असल्याची माहिती आज पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी शहरातील किनारा चौकात सापळा लावून हा टेम्पो अडवला. यावेळी एकाच टेम्पोत खाली ५२, आणि वर फळ्यावर ५०, अशी एकूण १०२ जनावरे दिसून आली.
ही जनावरे अक्षरशः एकावर एक दाटीवाटीने कोंबली होती. गर्दीत एकमेकांना घासल्याने त्यांना जखमाही झाल्या होत्या. यात काही लहान वासरे होती. याच दाटीवाटीमुळे टेम्पोमध्ये २१ जनावरांचा दुर्दैवी मृत्यू झाला. काही लहान वासरांचे गळे चिरलेले होते. त्यामुळे टेम्पोतही रक्त सांडलेले होते. काही जनावरांचा श्वास गुदमरल्याने आणि चेंगरुन मृत्यू झाला. आतापर्यंत १०२ पैकी ६६ जनावरांचा मृत्यू झाला असून इतरांची प्रकृती देखील चिंताजनक आहे. त्यामुळे मृत जनावरांचा आकडा वाढण्याची देखील दाट शक्यता आहे.
आष्टी ठाण्यातील पोलीस हवालदार विकास राठोड यांच्या फिर्यादीवरून वाहन चालक जाकीर जलाल शेख (वय २३ वर्ष, राहणार हादगाव, जिल्हा अहमदनगर) व मालक फिरोज रशीद शेख (राहणार धाराशिव) या दोघांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही घटना अत्यंत दुर्दैवी असून या घटनेचा प्राणी मित्रांनी निषेध करत आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा करण्याची मागणी पोलीस प्रशासनाकडे केली आहे.
यावेळेस पोलीस प्रशासनाने देखील नागरिकांना आवाहन केले आहे, की अशा प्रकारे गोवंश जातीची जनावरे किंवा इतर जनावरे कुणी तस्करी करत असेल आणि याची माहिती मिळत असेल तर तात्काळ पोलीस प्रशासनाला कळवावी.