येत्या पावसाळ्यात त्रास होऊ नये म्हणून या घाटात युद्धपातळीवरती काम सुरू आहे. परशुराम घाटात अवघड ठिकाणी काम करावे लागणार असल्याने हा घाट वाहतुकीसाठी बंद करण्याची मागणी या राष्ट्रीय महामार्ग ऍथॉरिटीकडून जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली होती. त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून निर्णय घेण्यात आला आहे आहे.
परशुराम घाटात १.२० कि.मी लांबी ही उंच डोंगर रांगा खोल दऱ्या असल्याकारणाने चौपदरीकरणाचे काम करण्यासाठी हा भाग अवघड स्वरुपाचा आहे. उर्वरीत १०० मीटर लांबीतील काम हे अवघड स्वरूपाचे आहे या मार्गात सुमारे २५ मीटर उंचीपर्यंत डोंगराचे खोदकाम असल्याने सदर भागामध्ये चार टप्प्यांमध्ये खोदकाम करण्यात येत असून त्यापैकी तीन टप्प्यातील खोदकाम पूर्ण झाले आहे. उर्वरीत चौथ्या टप्प्याचे काम प्रगतीत आहे.
उर्वरीत १०० मीटर मधील चौथ्या टप्याचे काम हे अवघड स्वरुपाचे आहे. सदर ठिकाणी काम करताना घाटातील दगड अथवा डोंगरावरील विखुरलेली माती खाली कार्यरत महामार्गावर येऊन अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर सदर प्रकल्पासाठी नियुक्त करण्यात आलेल्या में. कशेडी परशुराम हायवे प्रा.ली.यांनी या ठिकाणाच्या कामासाठी परशुराम घाट वाहतुकीसाठी बंद ठेवणे बाबत विनंती करण्यात आली होती.
त्या अनुषंगाने महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम हे पावसाळयापूर्वी पूर्ण करण्यासाठी व संभाव्य जिवित व वित्त हानी टाळण्यासाठी परशुराम घाट वाहतुकीसाठी काही कालावधीत बंद ठेवावा अशी मागणी करणारे पत्र राष्ट्रीय महामार्ग पेण विभागाकडून रत्नागिरी जिल्हा प्रशासनाला देण्यात आले होते. २५ एप्रिल २०२३ ते दिनांक १० मे २०२३ या कालावधीत दु. १२ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाकडून घेण्यात आला आहे.