कर्जत तालुक्यात आमदार शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्यात सर्वच आघाड्यांवर चुरशीचे राजकारण सुरू आहे. त्यातच शिंदे यांनी आपण आगामी विधानसभा आणि संधी मिळाली तर लोकसभा निवडणूकही लढविणार असल्याची घोषणा केली आहे. याच दरम्यान सध्या बाजार समितीची निवडणूक होत आहे. शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कर्जत व जामखेड तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीतील भाजप प्रणित स्वाभिमानी शेतकरी विकास पॅनेलची घोषणा करण्यात आली.
मंगेश जगताप, अभय पाटील, काकासाहेब तापकीर, प्रकाश शिंदे, रामदास मांडगे, भरत पावणे, नंदकुमार नवले, महिला राखीव – विजया गांगर्डे, लिलावती जामदार, ग्रामपंचायत मतदार संघ – सुरेश मोढळे, बळीराम यादव, अनुसूचित जाती/जमाती – बाळासाहेब लोंढे, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक – सभाजी बोरुडे, इतर मागासवर्गीय – नितीन पाटील, व्यापारी/आडते मतदार संघ – अनिल भंडारी, कल्याण काळे, विमुक्त जाती/भटक्या जमाती- लहू वतारे, हमाल/मापाडी मतदार संघ – बापूसाहेब नेटके यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली.
यामध्ये तापकीर आणि यादव यांच्या नावामुळे चर्चा सुरू झाली.
बाजार समितीच्या निवडणुकीत पक्षचिन्ह नसते. असे असले तरी राजकीय दृष्ट्या नेता ज्या पक्षाचा आहे, त्याच पक्षाचं म्हणून हे पॅनल ओळखलं जातं. त्यामुळे शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पॅनलमध्ये राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षाचा आणि ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याचा समावेश झाल्याने शिंदे यांनी राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला धक्का दिल्याचे मानले जाते.