गावात आईसह राहणारा अक्षय सर्वांनाच परिचित आहेत. आई आणि अक्षयची उंची केवळ साडेतीन फूट इतकी आहे. अक्षयचा जन्म झाल्यावर केवळ तीन महिन्यातच वलगावला राहणाऱ्या त्याच्या वडिलांनी त्याला आणि आईला सोडल्याने रेखा चौरे यांनी आपला मुलगा अक्षयला घेऊन रावळगाव येथे स्थाईक झाल्यात. अक्षयच्या आजोबांनी त्याला राहण्यासाठी घर आणि तीन एकर शेती दिली.अक्षय आणि त्याची आई रेखा या दोघांच्याही उंची साडेतीन फूट असून त्यांनी दिव्यांगत्वावर मात करून गावात आपल्या शेतात केलेला विक्रम संपूर्ण तालुक्यात चर्चेचा विषय ठरला आहे.
शेती म्हणजे कठीण काम ते तुला जमणार नाही, शेतीत काम करणं अभ्यास करणे इतके सोपे नाही, असे गावातील एक दोघे जण अक्षयला म्हणत होते. मात्र, त्यांच्या या अशा बोलण्याने खचून न जाता त्याने आईसोबत शेती करण्याचा निर्णय घेतला. आज तीन एकर पैकी पाऊण एकर शेतात आम्ही अवघ्या चार महिन्यात शंभर क्विंटल कांद्याचे विक्रमी उत्पादन घेतल्याची माहिती अक्षयने दिली.
जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यात देणाऱ्या रावळगाव येथील युवा शेतकरी अक्षय बाबाराव चौधरी व त्यांची आई रेखा चौरे ह्या स्वतः च्या शेतासह दुसऱ्यांच्या शेतात शेतीच्या काम करीत असत. अक्षयचे प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्या नंतर त्याने आसेगाव पूर्णा येथे त्याचे माध्यमिक शिक्षण पूर्ण झाले. अचलपूरच्या जगदंबा महाविद्यालयात त्याने कला शाखेत पदवीचे शिक्षण पूर्ण करून आवडता विषय अर्थशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेतले. विदर्भ ज्ञान संस्था येथे त्याने अर्थशास्त्रात दोन वेळा पदव्युत्तर पदवी घेतली. एकाच विषयात दोन वेळा पदव्युत्तर पदवी घेत अर्थशास्त्रातील २५ पैकी पंधरा विषय मी शिकलो असल्याची माहिती अक्षय अभिमानाने देतो. मी दिव्यांग असल्याची कधीही खंत वाटली नाही. विशेष म्हणजे दिव्यांग असल्याने मला गावात कधी कोणी चिडवलेसुद्धा नाही. माझे मित्र मला आसेगाव येथील शाळेत त्यांच्या सायकलवर घेऊन जात असत शिक्षण घेत असतानाच मी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास देखील करतो आहे. यासोबतच मी माझ्या घरी सेतू केंद्र देखील चालवतो. अक्षयची आई गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत खिचडी बनविण्यासाठी मदतनीस म्हणून पण काम करते स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असतानाच करून आला व त्यानंतर दुसऱ्याकडे काम करण्याऐवजी मी आपल्या शेतीत काम करण्याचे ठरवले आणि बघता बघता पाऊण एकरामध्ये १०० क्विंटल कांदा पीक घेतल्याने आता मी आनंदी असल्याचे सुद्धा अक्षय सांगतो.
‘महाराष्ट्र टाईम्स’सोबत बोलताना अक्षय म्हणाला की, मी अर्थशास्त्राचा विद्यार्थी आहे कृषी अर्थशास्त्र हा विषय मला होता. यामुळे शेतीचे आर्थिक नियोजन कसे करायला हवे याची जाणीव मला आहे. माझ्या शेतात कांद्याची लागवड करण्याऐवजी कांद्याची पेरणी केली. लागवडीच्या कांद्यापेक्षा पेरणीचा कांदा हा आर्थिकदृष्ट्या परवडणारा आहे. अर्ध्यापेक्षा कमी खर्चात अधिक उत्पन्न पेरणीच्या कांद्याद्वारे मिळते. मजुरीचा खर्च देखील कमी येत असल्यामुळे एकूण उत्पन्नात मोठी भर पडते. विशेष म्हणजे पेरणीच्या कांद्याचा कालावधी आपल्या नियोजनाप्रमाणे कमी जास्त देखील करता येतो. शेतीचा खर्च पाहता येणाऱ्या काळात शेतकऱ्यांना पेरणी पद्धतीने कांदा घेणे फायदेशीर असून रासायनिक खतांचा वाढलेला भाव मजुरीचा भाव हे पाहता लागवडीचा कांदा ऐवजी पेरणीचा कांदा परवडतो. पेरणीच्या कांद्याला एकरी तीस हजार रुपये खर्च येतो आणि त्याद्वारे दीड लाख ते एक लाख ऐंशी हजार रुपये मिळतात. मला असे वाटते की, शेतकऱ्यांनी देखील पेरणीचा कांदा घ्यावा, म्हणजे पिकावर होणारा खर्च कमी होऊन पिकाला मिळणारा भाव हा अधिक असल्याने शेतकऱ्याचा फायदाच होईल, असा सल्ला अक्षयने दिला.