• Sat. Sep 21st, 2024
संजय सर आता दिसणार नाहीत; भरधाव टिप्परची शिक्षकाच्या दुचाकीला धडक; बाप-लेकाचा जागीच अंत

जालना: जालना जिल्ह्याच्या अंबड तालुक्यातील वडीगोद्री येथील मराठा शिक्षण संस्था संचलित श्री. गुरुदेव विद्या मंदिर उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या संजय दहिफळे यांच्या दुचाकीचा काल मंगळवारी छत्रपती संभाजीनगरातील नक्षत्रवाडी येथे भीषण अपघात झाला. या अपघातात संजय दहिफळे (वय ४०) आणि त्यांचा मुलगा समर्थ दहिफळे (१०) या दोघांचा मृत्यू झाला. या अपघाताची माहिती मिळताच वडिगोद्री परिसरातील ग्रामस्थांनी एक चांगला आपलासा आणि विनम्र शिक्षक काळाच्या पडद्याआड गेल्याने हळहळ व्यक्त केली आहे. संजय दहिफळे ये पैठण येथील रहिवासी होते.

वडीगोद्री येथील श्री. गुरुदेव विद्या मंदिर उच्च माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक संजय दहिफळे गेल्या १५ वर्षांपासून संस्थेमध्ये विना अनुदान तत्त्वावर शिक्षक म्हणून कार्यरत होते. ते पैठणहून वडीगोद्री येथे ये-जा करत असत. तब्बल १५ वर्षानंतर मागील महिन्यात संस्थेकडून २० टक्के अनुदानात त्यांना घेण्यात आले. दोन दिवसांपूर्वी पहिला पगार झाल्यानंतर त्यांनी संस्थेतील प्राचार्य, प्राध्यापक आणि शिक्षक यांना पेढे वाटून आनंद साजरा केला. इतक्या दिवस मन लावून सेवा केल्याचे फळ मिळाले या आनंदात ते होते. विशेष म्हणजे काल मंगळवारी रोजच्या प्रमाणे कॉलेज सुटल्यानंतर वडीगोद्री येथील धार्मिक कार्यक्रमाच्या ठिकाणी येऊन दर्शन घेतल्यानंतर गावकऱ्यांसोबत त्यांनी प्रसादही घेतला. त्यानंतर ते छत्रपती संभाजीनगरला गेले.

IPL खेळणाऱ्या भारतीय खेळाडूसाठी आली मोठी बातमी; ऑस्ट्रेलियाने WTC फायनलचे पत्ते उघडले
तिथून पैठणकडे जात असताना नक्षत्रवाडी येथे भरधाव वेगाने येणाऱ्या टिप्परने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. धडक इतकी भीषण होती की या अपघातात संजय दहिफळे आणि त्यांचा मुलगा समर्थ यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांच्या पत्नी वर्षा दहिफळे या गंभीर जखमी झाल्या. अपघात होताच परिसरातील नागरिकांनी संजय दहिफळे आणि समर्थचा मृतदेह जागेवरून हलवत वाहतूक सुरळीत केली. तर संजय यांच्या पत्नी वर्षा यांना छत्रपती संभाजीनगर येथील सिग्मा हॉस्पिटलला नेण्यात आहे. या घटनेमुळे वडीगोद्रीतील शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांमध्ये शोककळा पसरली असून आजपासून संजय सर दिसणार नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये देखील शोककळा पसरली आहे.

संजय यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, भावजई, अकरावीत शिक्षण घेणारी १ मुलगी आणि जखमी पत्नी असा परिवार आहे. सरांच्या आणि समर्थच्या अपघाती निधनाने दहिफळे कुटुंबांवर आभाळ दु:खाचा डोंगर कोसळला आहे. आज छत्रपती संभाजी नगर येथील घाटी रुग्णालयात त्यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केल्यानंतर त्यांच्या मूळगावी पैठण येथे अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.
तीन फुटांची उंची, गावकरी म्हणाले तू काय शेती करणार? अमरावतीच्या पठ्ठ्याने अवघ्या पाऊण एकरात सोनं पिकवलं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed