मी थोड्यावेळात देहू येथे जाणार आहे. तेथून रात्री मुंबईला रवाना होईन. मी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची बैठक बोलावली ही बातमी खोटी आहे. अशी कोणतीही बैठक ठरलेली नाही. पक्षाचे अध्यक्ष जयंत पाटील हे त्यांच्या भागातील बाजार समितीच्या निवडणुकीच्या कामात आहेत. अजित पवारही त्याच कामात आहेत. या निवडणुकीची जबाबदारी या दोघांवरच आहे, बाकी कोणावरही नाही. मीदेखील माझे ठरलेले दौरे करत आहे, असे शरद पवार यांनी सांगितले. यानंतरही प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही आमदार फुटून अजित पवार यांच्यासोबत जाणार असल्याच्या चर्चेविषयी शरद पवार यांना विचारणा केली. त्यावर ‘मी एकदा विषय स्पष्ट सांगितल्यानंतर तुम्हाला त्यासंबंधी फाटे फोडण्याचा अधिकार नाही’, असे शरद पवार यांनी ठणकावून सांगितले.
अजित पवारांच्या समर्थक आमदारांकडून सूचक वक्तव्य
कालपासून अजित पवार यांचे समर्थक मानले जाणारे राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही आमदार सूचक वक्तव्य करताना दिसत आहेत. माणिकराव कोकाटे आणि अण्णा बनसोडे यांनी अजित पवार घेतील, तो निर्णय आपल्याला मान्य असल्याचे सांगितले आहे. त्यानंतर मंगळवारी पुन्हा एकदा अण्णा बनसोडे यांनी सूचक वक्तव्य केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे किती आमदार अजित पवार यांच्यासोबत आहेत हे थोड्याच वेळात समजेल. मी त्यांना थोड्यावेळात भेटणार आहे. दादा जिथे जाणार तिथे अण्णा बनसोडे असणार, असे बनसोडे यांनी म्हटले.