• Mon. Nov 25th, 2024
    राजकीय स्वार्थाशिवाय इतकी लोकं बोलावली जातात का? महाराष्ट्र भूषण दुर्घटनेवरुन राज यांचा निशाणा

    नवी मुंबई:आप्पासाहेब धर्माधिकारी यांना राजभवनात बोलावून महाराष्ट्र भूषण पुरस्कार देता आला असता. खारघरमध्ये इतकी लोकं बोलावून कार्यक्रम करण्याची काहीही आवश्यकता नव्हती, असे वक्तव्य मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी केले. सकाळऐवजी हा कार्यक्रम संध्याकाळच्या वेळेत ठेवला असता तर हा प्रसंग टळला असता. असे प्रकार कोणी काही हेतुपूर्वक करत नाही. त्यामुळे या दुर्घटनेसाठी कोणाला आणि कसं जबाबदार ठरवायचं हे कळत नाही, असे राज ठाकरे यांनी म्हटले. राज ठाकरे यांनी सोमवारी नवी मुंबईच्या एमजीएम रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली. यानंतर राज ठाकरे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

    या पत्रकार परिषदेत राज ठाकरे यांना राजकीय स्वार्थामुळे महाराष्ट्र भूषण सोहळ्यात दुर्घटना घडली का, असा प्रश्नही विचारण्यात आला. यावर राज ठाकरे यांनी, ‘राजकीय स्वार्थाशिवाय इतकी लोकं बोलावली जातात का?’ असा प्रतिप्रश्न उपस्थित करत शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला. ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यासाठी खारघरमध्ये रविवारी आयोजित करण्यात आलेल्या सोहळ्यात उष्माघातामुळे १२ श्रीसेवकांचा मृत्यू झाला आहे. या घटनेवरुन राजकीय वातावरण प्रचंड तापले आहे. राज्य सरकारच्या ढिसाळ नियोजनामुळेच ही दुर्घटना घडली, असा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. राज ठाकरे यांनी नवी मुंबईत जखमींच्या भेटीला जाण्यापूर्वी एक ट्विटही केले होते. या ट्विटमध्ये त्यांनी महाराष्ट्र भूषण दुर्घटनेविषयी संताप व्यक्त केला.

    महाराष्ट्र भूषण दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला, कल्याणमधील श्रीसेवकाचा उपचारादरम्यान मृत्यू

    राज ठाकरे ट्विटमध्ये नेमकं काय म्हणाले?

    काल ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी ह्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान झाला, ही अतिशय आनंदाची बाब आहे. हा पुरस्कार जेव्हा घोषित झाला तेव्हा मी आप्पासाहेबांचं आणि सरकारचं अभिनंदन केलं होतं. पण ह्या सोहळ्याला जे गालबोट लागलं ते टाळता आलं नसतं का ? कधी नव्हे ते मुंबईत सुद्धा उष्माघाताच्या बातम्या वाचायला मिळत असताना, इतक्या कडाक्याच्या उन्हात हा कार्यक्रम न करता त्याची वेळ संध्याकाळची असावी हे प्रशासनाला कळलं नाही का? सरकारने जरी मृतांच्या नातेवाईकांना मदतीची घोषणा केली असली तरी इतक्यावर न थांबता अशा दुर्दैवी घटना पुन्हा होणार नाहीत आणि प्रशासन अशा चुका करणार नाही ह्याची काळजी घ्यावी. ह्या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या श्री सदस्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात महाराष्ट्र नवनिर्माण सेना सहभागी आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *