२००८ साली तत्कालीन शिवसेनेच्या वतीने नांदेड मध्ये महागाई विरोधात आंदोलन केले होते. तेव्हाच्या सेनेच्या आमदार अनुसया खेडकर यांच्या नेतृत्वाखाली शहरातील हिंगोली गेट भागात आंदोलन करण्यात आले. आंदोलन सुरू असताना अचानक या आंदोलनाला हिंसक वळण लागले. आंदोलनकर्त्यानी एसटी बसेसवर दगडफेक केली . यात महाराष्ट्र एसटी महामंडळाच्या चार बसेस , आंध्र प्रदेशच्या चार बसेस आणि महापालिकेच्या एका बसचे नुकसान झाले होते. दगडफेकीत दोन पोलीस जखमी झाले होते .
तब्बल पंधरा वर्ष या खटल्याची सुनावणी आज जिल्हा सत्र न्यायालयात सुरु होती. यात एकरा साक्षीदार तपासण्यात आले. दोन जखमी पोलीसांची साक्ष महत्वाची ठरली. गुन्हा सिद्ध झाल्याने न्यायालयाने मंगळवारी माजी आमदार अनुसया खेडकर त्यांचे पुत्र महेश खेडकर , सेनेचे जिल्हा प्रमुख दत्ता पाटील कोकाटे, सह संपर्क प्रमुख भुजंग पाटील यांच्यासह १९ जणांना पाच वर्षाची शिक्षा आणि प्रत्येकी एक लाख साठ हजार दंड अशी शिक्षा न्यायलयाने ठोठावली होती. सर्वाणी एकत्रित दंडाची रक्कम भरल्या नंतरच जामीनासाठी हायकोर्टात विनंती अर्ज करू शकता असं सक्त निर्देश न्यायालयाने दिले होते. ज्यांना शिक्षा सुनावण्यात आली त्यापैकी अनेक जण गरीब आहेत. त्यांच्या घरची परिस्थिती देखील हालाखीची आहे. पैसे कुठून आणायचं असा मोठा प्रश्न त्यांच्या कुटुंबीयांनासमोर निर्माण झाला होता. अखेर या संकटातील शिवसैनिकाच्या मदतीला धावून येत उद्धव ठाकरे यांनी १७ जणांच्या दंडाची रक्कम जमा केली. विशेष म्हणजे भाजपात गेलेल्या तिघांपैकी दोघांची देखील मातोश्रीकडून मदत करण्यात आली आहे. संकटात मदतीला धावून आल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढला आहे.
मातोश्रीतून यांना मिळाली मदत
ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख दत्ता पाटील कोकाटे, सहसंपर्क प्रमुख भुजंग पाटील, नरहरी वाघ, बालाजी शिंदे, नवनाथ भारती, माजी पंचायत समिती सभापती व्यंकोबा रोगडे, भुजंग कावळे, बालगीर गिरी, बाळू तिडके, शिवाजी सूर्यवंशी, श्रीकांत पाठक, सुभाष शिंदे, भैया शर्मा यांच्या सह भाजपाचे संदीप छपरवार, मनोज यादव आणि इतर एकाची मातोश्रीकडून मदत करण्यात आली आहे. तर दूसरीकडे माजी आमदार अनुसया खेडकर आणि भाजपाचे दिलीप ठाकूर यांनी पहिल्याच दिवशी दंडाची रक्कम कोर्टात जमा केली होती.
दरम्यान दंडाची रक्कम भरल्यानंतर या शिवसैनिकांच्या जमीनासाठी जिल्हा प्रमुख माधव पावडे यांनी कागदपत्रे घेऊन छत्रपती संभाजी नगरला रवाना झाले आहेत. त्यांनी वकिलाची भेट देखील घेतली आहे. लवकरच या शिवसैनिकांची जामीनावर सुटका होणार असा विश्वास जिल्हा प्रमुख माधव पावडे यांनी व्यक्त केला आहे. निष्ठावंत शिवसैनिकांच्या संकटकाळात मदतीला धावून आल्याने पावडे यांनी उद्धव ठाकरे, खासदार विनायक राऊत, बबन थोरात यांच्या सह ठाकरे गटाच्या इतर नेत्यांचे आभार मानले आहेत.