• Thu. Nov 28th, 2024
    अतिउष्ण दिवस, श्रीसेवकांना उष्माघाताचा त्रास होईल हे सरकारला समजलं नाही का; वसंत मोरेंचा सवाल

    पुणे:नवी मुंबईच्या खारघर येथे महाराष्ट्र भूषण कार्यक्रमात झालेल्या दुर्घटनेत ११ श्रीसेवकांचा मृत्यू झाला. उष्माघातामुळे हे सर्वजण बेशुद्ध होऊन कार्यक्रम सुरु असलेल्या मैदानात कोसळले. यानंतर या सर्वांचा उपचारादरम्या मृत्यू झाला. महाराष्ट्र भूषण कार्यक्रमासाठी आलेल्या श्रीसेवकांना अनेक तास रणरणत्या उन्हात तिष्ठत बसून राहावे लागले. सकाळी १० वाजताचा कार्यक्रम दुपारी दोन वाजेपर्यंत सुरु होता. कोणत्याही आडोशाशिवाय बसलेल्या श्रीसेवकांना या कडक उन्हाचा थेट तडाखा बसला. अशातच पाणी न मिळाल्यामुळे मैदानातील श्रीसेवक एकापाठोपाठ एक बेशुद्ध पडायला लागले. उष्माघातामुळे बेशुद्ध पडणाऱ्यांची संख्या मोठी होती. त्यामुळे कार्यक्रमस्थळी त्यांना योग्यवेळी उपचार मिळाले नाहीत. परिणामी ११ श्रीसेवकांचा मृत्यू झाला. या घटनेवरुन पुण्यातील मनसेचे नेते वसंत मोरे यांनी राज्य सरकारवर ताशेरे ओढले आहेत. राज्य सरकारने हा कार्यक्रम शक्तीप्रदर्शनासाठी आयोजित केल्याचा अप्रत्यक्ष आरोप वसंत मोरे यांनी केला.

    वसंत मोरे यांनी फेसबुकवर एक पोस्ट शेअर करुन सरकारच्या भूमिकेवर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी अप्पासाहेब धर्माधिकारी यांचे पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदन केले असले तरी कार्यक्रमाच्या ढिसाळ नियोजनावर सडकून टीका केली आहे.

    महाराष्ट्र भूषण सोहळ्यात मृत्यूचं तांडव; नागपूरची सभा आटोपून उद्धव ठाकरे, अजितदादा थेट रुग्णालयातच पोहोचले

    वसंत मोरे यांनी फेसबुक पोस्टमध्ये नेमकं काय म्हटलं?

    महाराष्ट्र भूषण श्री.आप्पासाहेब धर्माधिकारी यांचे प्रथम अभिनंदन…! पण नियोजनात नक्की चुकले कोण ? कै.नानासाहेब असतील किंवा आप्पासाहेब ही दोन नावे आली की श्रीसेवकांची गर्दी ही आलीच हे कदाचित सरकारला माहित होते, त्याची कारणं पुढीप्रमाणे

    वाहनांच्या पार्किंग साठी २१ मैदाने राखीव,
    ३२ पार्किंग स्लॉट,
    २० हजार बसेससाठी पार्किंग,
    खारघर ते सेंट्रल पार्क पर्यंत खास बस व्यवस्था, पेट्रोलिंगसाठी १० रुग्णवाहिका,
    १० हजार शोचालय,
    ४२०० मोबाईल शौचालाय,
    ५५ मेडिकल बूथ प्रत्येक बुथवर २ डॉक्टर १० नर्स आणि १० स्वयंसेवक,
    शहरातील ५ हॉस्पिटल मध्ये १०० बेड राखीव,
    ७० रुग्णवाहिका,
    जागेवर एक छोटे हॉस्पिटलच तयार,
    ५०० छोट्या अग्निरोधक यंत्रणा,
    ८ क्विक रिस्पॉन्स टीम,
    वनविभागाचे कर्मचारी,
    सर्पमित्रांची एक मोठी टीम,
    अग्निशमन दलाच्या १२ गाड्या,
    सिडकोकडून पाण्याची सेप्रेट नवीन लाईन,
    १३ वेगवेगळ्या कंपनीचे टॉवर,

    जर इतकी व्यवस्था सरकारने केली होती याचाच अर्थ उष्माघाताचा त्रास श्रीसेवकांना होवू शकतो हे त्यांना माहीतच होते, इतके सगळे नियोजन केलेच होते तर मग वेळेचे नियोजन सरकारला का करता आले नाही ? आजचा दिवस अतिउष्ण होता याचा अंदाज सरकारने का घेतला नाही ? चला याही पेक्षा सोपे कितीतरी कोटी रुपये या समारंभावर सरकारने खर्च केले तेच पैसे जर महाराष्ट्र भूषण आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या ट्रस्ट ला दिले असते तर त्यांनी ते पैसे खऱ्या अर्थाने लोकोपयोगासाठी खर्च केले असते आणि त्या ८ निष्पाप श्रीसेवकांचा जीव ही वाचला असता.

    महाराष्ट्र भूषण सोहळ्यात नेमकं काय घडलं, इतक्या लोकांचे मृत्यू कसे झाले, तापमान नेमकं किती होतं?

    पण असो नक्की ही गर्दी सरकारला कोणाला दाखवायची होती ? हा एक मोठा प्रश्नच आहे. आप्पासाहेबांचे सामाजिक कार्यात योगदान कोणत्याही पुरस्कारापेक्ष कितीतरी मोठे आहे. कारण पुरस्कारात मिळालेले २५ लाख ही त्यांनी पुन्हा मुख्यमंत्री निधीला परत दिले, तर मग सरकारने साध्य काय केले ? असो अप्पासाहेबांचे अभिनंदन तरी कसे करायचे पण त्या निष्पाप श्रीसेवकांना भावपूर्ण श्रद्धांजली… या अशा ढिसाळ नियोजनातून सरकारने काहीतरी बोध घ्यावा हे मात्र मी तरी नक्की सुचवेल… तुमचे मत काय ?, असा सवाल वसंत मोरे यांनी विचारला आहे.

    डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार, सोहळ्याला लाखो श्रीसदस्यांची हजेरी

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed