उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर दोन दिवसांनी शरद पवार यांनी दिल्लीत काँग्रेस नेते राहुल गांधी आणि काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचीही भेट घेतली. राष्ट्रवादी काँग्रेसमधून काही आमदारांचा गट कदाचित फुटलाच, तर त्याला आपला पाठिंबा नाही. आपण विरोधकांसोबतच आहोत, हेच या भेटीतून पवारांना दाखवून द्यायचे होते, असेही बोलले जात आहे.
भेटीवर राऊतांचे भाष्य
मंगळवारी संध्याकाळी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यातील भेटीविषयी खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेच्या मुखपत्रात भाष्य केले आहे. ‘या भेटीमध्ये मी देखील सहभागी होतो. यावेळी पवार म्हणाले की, कोणालाही मनापासून सोडून जायचे नाही, पण कुटुंबाला टार्गेट केले जात आहे. कुणाला काही व्यक्तिगत निर्णय घ्यायचे असतील, तर तो त्यांचा प्रश्न, पण ‘पक्ष’ म्हणून आम्ही भाजपबरोबर जाण्याचा निर्णय घेणार नाही. महाराष्ट्रातील लोकांमध्ये सध्याच्या सरकारबद्दल कमालीचा संताप आहे. जे आता भाजपबरोबर जातील ते राजकीय आत्महत्या करतील, असे पवार-ठाकरे यांचे मत पडले,’ असा गौप्यस्फोट संजय राऊतांनी केला आहे.
‘अमित शहांना भेटलो नाही’
नागपूर : ‘केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबईत आल्यापासून सगळे कॅमेरे त्यांच्यावर स्थिरावले आहेत. मी त्यांना भेटलेलो नाही. भेटलो असतो, तर कॅमेऱ्यात दिसलो असतो. माझ्यावरचे प्रेम अचानक का उतू जात आहे, हे कळत नाही’, अशी स्पष्टोक्ती विधानसभेतील विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी केली. नागपुरातील वज्रमूठ सभेला उपस्थित राहण्यासाठी अजित पवार रविवारी नागपुरात दाखल झाले. माध्यमांशी बोलताना त्यांनी, अमित शहा यांना भेटल्याच्या वृत्ताचा इन्कार केला. ‘आज राज्यात सत्तेवर असलेल्या भाजप आणि शिवसेना पक्षाकडे बहुमत आहे. त्यांचे आमदार अपात्र झाले, तरी काही फरक पडेल असे वाटत नाही. कारण नसताना वावड्या उठविल्या जात आहेत.’ असेही अजित पवार म्हणाले. रविवारच्या वज्रमूठ सभेला काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची अनुपस्थिती होती. नांदेड जिल्ह्यात असलेल्या स्थानिक निवडणुकांमुळे त्यांना उपस्थित राहता येणार नसल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले.