• Thu. Nov 28th, 2024
    आईची शेतात मजूरी, वडील ट्रॅक्टरवर चालक; जळगावची रेखा हॉगकाँगमध्ये भारतासाठी खेळणार

    रेखा पुना धनगर हिची बेसबॉल खेळण्यासाठी भारताच्या महिला संघात निवड झाली आहे. २१ मे ते २ जून दरम्यान हाँगकाँग येथे होणाऱ्या एशियन कप या बेसबॉलच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत रेखा भारताचं प्रतिनिधीत्व करणार आहे. रेखाच्या कामगिरीमुळे जळगावचं नाव पुन्हा देशातच नव्हे तर सातासमुद्रापार पोहचलं आहे. आंतराष्ट्रीय स्तरावर खेळणारी रेखा धनगर ही जळगाव जिल्ह्यातील पहिलीच आहे. चाळीसगाव तालुक्यातील वाघळी या गावातील रेखा अतिशय गरीब कुटुंबातील आहे. तिचे वडील ट्रॅक्टरवर चालक म्हणून मजुरी काम करतात. चार बहिणी आणि एक भाऊ असं रेखाचं कुटुंब आहे. रेखाची आईदेखील शेतात मजुरी काम करते. आई वडील दोघांच्या मजुरीने घरखर्च भागत नसल्याने रेखाच्या बहिणींनी आणि भावाने शाळा सोडली. तेदेखील आई वडीलांसोबत मजुरी कामाला जायचे आणि कुटुंबाला हातभार लावायचे. रेखा ही लहानपणापासून हुशार असल्याने तिने पुढे शिकावं यासाठी तिच्या पाठीशी तिचे वडील खंबीरपणे उभे राहिले.

    भारताच्या बेसबॉल महिला संघात रेखाची निवड

    चाळीसगावातील राष्ट्रीय विद्यालय या महाविद्यालयात ११ वी ते पदवीपर्यंत रेखाचं शिक्षण पूर्ण झालं आहे. इथे शिकत असतांना ज्यावेळी रेखा बेसबॉल खेळायला पहिल्यांदा मैदानात उतरली, त्याचवेळी तिचे क्रीडा प्रशिक्षक अजय देशमुख यांनी रेखाला पारखलं. रेखाला त्यांनी बेसबॉलचं प्रशिक्षण दिलं. हालाखीची परिस्थिती असल्याने रेखाच्या मार्गात कुठलाही अडथळा निर्माण होऊ नये यासाठी अजय देशमुख यांनी असोसिएशनच्या माध्यमातून तसंच वैयक्तिकरित्या खर्चाची जबाबदारी उचलली. रेखानेदेखील प्रशिक्षक अजय देशमुख यांचा विश्वास सार्थ ठरवला. रेखाने प्रचंड मेहनत घेतली. तिने राज्य पातळीवर तसंच राष्ट्रीय पातळीवर स्पर्धांमध्ये यश मिळवलं. राष्ट्रीय स्पर्धांमधील यशानंतर रेखाचा आत्मविश्वास वाढला. याच प्रबळ आत्मविश्वास आणि प्रचंड जिद्दीच्या जाोरावर रेखाने स्वत:ला सिध्द केलं आणि बेसबॉलच्या महिलांच्या भारताच्या संघात आपलं स्थान‍ निश्चित केलं.

    मजुराच्या लेकीची सातासमुद्रापार भरारी

    मजुराच्या लेकीची सातासमुद्रापार भरारी

    भारतीय संघात निवड झाल्याचा आनंद गगनात मावेनासा असाच आहे. मात्र त्यापेक्षाही सर्वात मोठा आनंद म्हणजे माझ्या पाठीशी भारताचा तिरंगा राहणार आहे, असं रेखाने बोलताना सांगितलं. या स्पर्धेतही भारतासाठी सुवर्ण पदक मिळवून हाँगकाँगमध्ये बेसबॉलच्या स्पर्धेत भारताचं नाव कोरणार असल्याचं रेखा आत्मविश्वासाने सांगते. ट्रॅक्टरवर काम करणाऱ्या मजुराची मी मुलगी दुसऱ्या देशासाठी भारताच्या संघात खेळेल, असा कधी स्वप्नातही विचार केला नव्हता, मात्र मेहनत करत राहिले, त्यांच फळ मिळाल्याचं रेखाने सांगितलं.

    लग्नानंतर पतीनेही दिली साथ

    लग्नानंतर पतीनेही दिली साथ

    या यशाचं श्रेय ती तिचे आई वडील, तसंच क्रीडा प्रशिक्षक अजय देशमुख यांना देते. ६ नोव्हेंबर २०२२ मध्ये रेखाचा बारामती येथील अक्षय अशोक नरुटे यांच्याशी विवाह झाला आहे. तिचे पती अक्षय व्यावसायिक आहेत. रेखाला खेळाची आवड असल्याने पती आणि सासरच्यांनीदेखील तिला लग्नानंतर थांबवलं नाही आणि रेखा सुध्दा थांबली नाही, कारण तिला भारतासाठी खेळायंच होतं. त्यामुळे आई वडीलांबरोबरच लग्नानंतर पती तसंच सासरचेही माझ्या पाठीशी भक्कमपणे उभं असल्याने आज इथपर्यंत पोहचू शकली असं रेखा सांगते. तसंच या स्पर्धेत चांगला खेळ करुन वडिलांच, प्रशिक्षकांचं, महाविद्यालय, गावांच नाव मोठ करणार असल्याचंही रेखा सांगते.

    शेतमजूराची लेक आंतरराष्ट्रीय बेसबॉल स्पर्धेत करणार भारताचं प्रतिनिधित्व

    आई-वडिलांचे पांग फेडले; शेतमजूराची लेक आंतरराष्ट्रीय बेसबॉल स्पर्धेत करणार भारताचं प्रतिनिधित्व

    आंतराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडावेत यासाठी प्रयत्नशील राहणार

    आंतराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडावेत यासाठी प्रयत्नशील राहणार

    माझ्या प्रमाणेच ग्रामीण भागातील इतरही आंतराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडावेत म्हणून भविष्यात प्रयत्नशील राहणार असल्याचा रेखाचा मानस आहे. सर्वांमध्ये एक कलागुण असतो, मुलगी आहे म्हणून काय झालं, माझ्या आई वडिलांप्रमाणेच प्रत्येकाने मुलीच्या कलागुणांना वाव द्यावा, तिला प्रोत्साहन द्यावं. तसंच मुलींनीही स्वत:ला कमी लेखू नये असं झालं तर, माझ्याप्रमाणे प्रत्येक मुलगी ही पुढे जावून देशाचं नाव मोठं करेन, अशी अपेक्षाही रेखाने व्यक्त केली आहे. रेखा धनगरने अकरावीपासून तर आतापर्यंत खेळात सातत्य ठेवलं, त्यामुळेच तिने भारताच्या संघापर्यंत मजल मारली आहे. शेतमजुर कुटुंबातील रेखा हिची भारतीय संघात झालेली निवड माझ्यासाठी आणि आमच्या महाविद्यालयासाठी, तालुक्यासाठी तसंच राज्यासाठी मोठ्या अभिमानाची, गर्वाची गोष्ट असल्याचं रेखाचे प्रशिक्षक अजय देशमुख सांगतात.

    आम्ही कधी मुंबई, नाशिक पाहिलं नाही; लेक विदेशात खेळणार असल्याचा आनंद

    आम्ही कधी मुंबई, नाशिक पाहिलं नाही; लेक विदेशात खेळणार असल्याचा आनंद

    आपल्या लेकीबद्दल बोलताना रेखाच्या आई-वडिलांनी सांगितलं, की आम्ही खूप कष्ट केलं, मात्र तिला थांबवलं नाही. गरीब कुटुंबातील मुलीची भारताच्या संघात निवड झाली आहे. मुलीने माझं नाव कमावलं. आम्ही कधी नाशिक आणि मुंबई पाहिली नाही आणि आमची मुलगी चक्क विदेशात भारतासाठी खेळायला जात असल्याने या गोष्टींचा रेखाच्या आई-वडिलांना मोठा अभिमान आहे. अतिशय हलाखीच्या आणि खडतर परिस्थितीत जिद्दीने खेळून रेखाने संपादन केलेलं यश आणि तिची कामगिरी ग्रामीण भागातील मुलींसाठी नक्कीच प्रेरणादायी अशीच आहे. रेखाला आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी खूप खूप शुभेच्छा आणि तिच्या या दैदीप्यमान कामगिरीला मनापासून सलाम.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed