• Sat. Sep 21st, 2024

सागरी प्रदूषणाबाबत जनजागृतीसाठी ‘महास्व‍ीम २०२३’ चा शुभारंभ

ByMH LIVE NEWS

Apr 13, 2023
सागरी प्रदूषणाबाबत जनजागृतीसाठी ‘महास्व‍ीम २०२३’ चा शुभारंभ

मुंबई, दि. 13 : सागरी प्रदूषणाबाबत नागरिकांमध्ये जनजागृतीसाठी देशातील सर्वात मोठे सागरी साहसी जलतरण अभियान ‘महास्व‍ीम 2023’ चे उद्घाटन विशेष पोलिस महानिरीक्षक (व्हीआयपी सुरक्षा) कृष्णप्रकाश यांच्या हस्ते आज मुंबई येथे हिरवा झेंडा दाखवून करण्यात आले. या अभियानांतर्गत गेट वे ऑफ इंडिया ते एलिफंटा लेणी हा 16 किलोमीटरपर्यंतचा प्रवास देशभरातील जलतरणपटू पोहून पूर्ण करणार आहेत.

सागरी प्रदूषणाबाबत जनजागृती करणे, हा अभियानचा उद्देश आहे. जे. डी. स्पोर्ट यूथ फाऊंडेशन, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्वीमिंग, पोर्ट ट्रस्ट सामाजिक जनजागृती संस्था, बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने या अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे.

यावेळी बोलताना कृष्णप्रकाश म्हणाले की, भारतातील सर्वात मोठ्या जलतरण मोहिमेचा शुभारंभ गेट वे ऑफ इंडिया येथून होत आहे. सागरी प्रदूषण थांबविण्याचा संदेश या मोहिमेतून देशभर पोहोचणार आहे. त्यांनी सर्व जलतरणपटूंना ही मोहीम यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

आंतरराष्ट्रीय जलतरणपटू जयंत दुबळे यांनी या अभियानामध्ये सहभाग घेतला आहे. त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरील 34 किलोमीटरचा इंग्लिश खाडी 14 तास 39 मिनिटांत पोहून पार केल्याचा विक्रम केला आहे. त्यांच्यासह या अभियानात देशभरातून 75 जलतरणपटूंनी सहभाग घेतला आहे. या मोहिमेत सहभागी झालेल्या जलतरणपटूंना श्री. दुबळे मार्गदर्शन करणार आहेत.

यावेळी मुंबई पोर्ट प्राधिकरणाचे आदेश तितरमारे, मुंबई पोर्टचे उपसंरक्षक भाभूस चंद, सामाजिक जनजागृती संस्थेचे अनिल मोरे, मेहुल शहा, संस्थेचे पदाधिकारी तसेच जलतरणपटू यावेळी उपस्थित होते.

००००

प्रवीण भुरके/ससं/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed