• Sat. Sep 21st, 2024
पिवळाधम्मक-केशरी आंबा दिसला की लगेच खरेदी करु नका, तुमची फसवणूक होऊ शकते, कारण…

म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई: आता आंब्याचा हंगाम सुरू झाल्याने बाजारात पिवळ्याधम्मक-केशरी आंब्यांनी सगळीकडे ठाण मांडले आहे. मात्र आंबा पिकवण्यासाठी आरोग्यास घातक असलेल्या रसायनांचे फवारे मारण्याचे प्रकार काही विक्रेते करताना दिसत आहेत. त्यामुळे आंबे घेताना योग्य प्रकारे चौकशी करून, खात्रीच्या विक्रेत्याकडूनच घ्यावेत, याकडे लक्ष वेधण्यात येत आहे. शिवाय, कोकणी हापूसच्या नावाखाली कर्नाटकी आंबा तुमच्या गळ्यात पडण्याचीही शक्यता आहे.

एप्रिल आणि मे हा आंब्यांचा हंगाम. मात्र बाजारात येणारे आंबे हे कच्चे असतात. बाजारात आल्यावर ते पिकवावे लागतात. आंबा पिकवण्यासाठी पूर्वी कार्बाइड पावडरचा वापर केला जात असे. मात्र कार्बाइड आरोग्यास हानिकारक असल्याने, सरकारने त्याच्या वापरावर बंदी घातली. त्यानंतर इथेनॉलचा वापर करून आंबा पिकवण्यासाठी परवानगी देण्यात आली. मात्र पेटीत इथेनॉलचे फुगे ठेवण्याची परवानगी असताना, त्यांचा फवारा मारून आंबे पिकवले जात असल्याचे उघड झाले. त्यामुळे एफडीएने त्यावरही बंदी घातली. त्याच दरम्यान, आंबे पिकवण्यासाठी उबदार वातावरण असलेल्या ‘रायपनिंग चेंबर’ची व्यवस्था बाजार समितीच्या आवारात सुरू झाली असून, तिचा आता मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. व्यापाऱ्यांसाठीही हे फायदेशीर ठरले आहे.

मात्र काही विक्रेते आंब्यावर घातक रसायनांचे फवारे मारून आंबे पिकवण्याचे प्रकार करतात. असे आंबे खरेदी करण्यापासून सावधान राहण्याची गरज आहे. दीर्घकाळपासून व्यवसाय करणारे व्यापारी आरोग्यदायी पद्धतीनेच आंबे पिकवत असतात. कारण ग्राहकांचा विश्वास त्यांना गमावायचा नसतो. डोक्यावर एखाद-दुसरी आंब्याची पेटी घेऊन दारोदारी फिरणाऱ्या विक्रेत्यांकडील फळाबाबत मात्र अशी खात्री देता येत नाही. त्यामुळे केवळ खात्रीच्या विक्रेत्यांकडूनच आंबे विकत घ्यावेत, असा सल्ला देण्यात येतो.

बाजार आवारातही आंबा पिकवण्यासाठी रसायनांचे फवारे मारण्याचे प्रकार होत असल्याचे काही जणांचे म्हणणे आहे. बाजार समितीने त्यावर कारवाई करावी, अशी मागणी आहे. मात्र बाजारात आता सरकारने आखून दिलेल्या नियमानुसारच आंबे पिकवले जात असल्याचे बाजार समिती संचालकांचे म्हणणे आहे.

कर्नाटकी आंबा देऊन फसवणूक

काही किरकोळ विक्रते कर्नाटकी आंबे हापूस म्हणून विकतात. कर्नाटकी आंबा दिसायला हापूससारखा असला, तरी त्याला कोकणी हापूसची चव नसते. त्यामुळे ग्राहकांची फसवणूक होण्याची शक्यता असते.

आंबे पिकवण्यासाठी आता इथोफॉमचा वापर करण्याची परवानगी सरकारने दिलेली आहे. त्यानुसार बाजारात आता आंबे पिकवण्यासाठी इतर पर्यायांबरोबर इथोफॉमच्या पुड्यांचा वापर केला जात आहे. एफडीएने त्याला परवानगी दिली आहे. सध्या गरमीचा हंगाम असल्याने फळांवर पाण्याचे फवारे मारले जातात. मात्र फळे पिकवण्यासाठी कोणत्याही गैरमार्गाचा वापर केला जात नाही.

– संजय पानसरे, संचालक, फळ बाजार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed