म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई :मुंबईमध्ये सध्या करोनासह इतरही प्रकारच्या तापाचा जोर वाढत आहे. या तापाचे कारण शोधण्यासाठी पालिका रुग्णालयांतही बायोफायर चाचण्या उपलब्ध कराव्यात, अशी शिफारस टास्क फोर्सने करताच पालिकेनेही त्याबाबत पावले उचलली आहेत. ‘करोना, इन्फ्लुएन्झाचा संसर्ग वाढू लागल्याने या चाचण्यांची सोय पालिका रुग्णालयांतही असेल’, असे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त (आरोग्य) डॉ. संजीव कुमार यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स’ला सांगितले.करोनाच्या पूर्वीच्या लाटांच्या तुलनेत यंदा संसर्गाच्या काही लक्षणांमध्ये फरक आहे. फुफ्फुसांच्या क्षमतेवर या आजारामध्ये पूर्वीइतका विषाणूचा प्रादुर्भाव दिसत नाही. घशामध्ये वेदना, खोकला तसेच श्वसनमार्गाच्या वरच्या बाजूला लक्षणांची तीव्रता दिसून येते. त्यामुळे हा आजार नेमका कोणत्या गटातील आहे, याची चाचणी करणे गरजेचे आहे. इतर संसर्गामुळेही करोनासारखी लक्षणे दिसू शकतात. शरीरात विषाणू जिवंत स्वरूपात असल्यास त्याचे निदान करण्यासाठी प्रगत चाचण्या ‘बायोसेफ्टी पी’ चार स्तराच्या लॅबमध्ये होतात. पालिका रुग्णालयांत बायोफायर चाचण्या होणार असल्या तरी, त्या नेमक्या कोणत्या रुग्णालयांमध्ये होतील, हे अद्याप निश्चित झालेले नाही. मात्र यामुळे संमिश्र स्वरूपाच्या लक्षणांमध्ये संसर्गजन्य आजारांचे निश्चित निदान होण्यासाठी मदत होणार आहे.
सतर्क राहण्यासाठी तयारी
‘करोना रुग्णसंख्या धीम्या गतीने वाढती असली तरीही रुग्णालयामध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या कमी आहे. त्यामुळे काळजी करण्याचे कारण नाही. सर्वांना दिलासा मिळावा, तसेच नागरिकांमध्ये पालिकेविषयी विश्वास निर्माण व्हावा, यासाठी पूर्वतयारी करण्यात येत आहे’, असेही अतिरिक्त आयुक्त डॉ. कुमार यांनी सांगितले.
पालिकेतर्फे लवकरच लसीकरण
करोना रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने दक्षतेसाठी आता सामान्यांकडून लशीची मागणी होऊ लागली आहे. मात्र सध्या लस उपलब्ध नसल्याने अडचण होत आहे. लशींसाठी पालिकेने मागणी नोंदवली आहे. मात्र लशींचा साठा केव्हा उपलब्ध होईल, याची कोणतीही माहिती पालिकेस अद्याप मिळालेली नाही. बूस्टर मात्रेसाठी होणारी मागणी लक्षात घेता पालिकेच्या काही रुग्णालयांमध्ये लसीकरण पुन्हा सुरू करण्यात येणार आहे.