मुंबईच्या सर्वच भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. पश्चिम उपनगरात मुसळधार पाऊस झाला. यामध्ये अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, विलेपार्ले परिसरामध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. तर मुंबई एअरपोर्ट परिसरात देखील वादळी पाऊस झालाय.
दरम्यान, गेल्या ८ ते १० दिवसांपासून राज्यात अवकाळी पावासाचा जोर वाढला आहे. राज्याच्या विविध भागात हा पाऊस कोसळत आहे. याचा मोठा फटका शेती पिकांना बसत आहे. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांची उभी पिकं आडवी झाली आहेत. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. केळी, आंबा, संत्रा, द्राक्ष या बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.
तर रब्बी हंगामातील गहू, हरभरा, ज्वारी तसेच कांदा या पिकांना देखील मोठा फटका बसला आहे. भाजीपाला पिकांचेही मोठं नुकसान झालं आहे. नाशिक जिल्ह्यात सर्वात जास्त कांदा पिकाचे नुकसान झालं आहे. काढणी केलेला कांदा या पावसामुळे जागेवरच सडत असल्याची स्थिती आता निर्माण झाली आहे.