श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याचे पंचवार्षिक निवडणूक सध्या लागली असून जिल्ह्याचे राजकारण चांगलेच तापले आहे. कारखान्याच्या कराराचा भंग केला असे म्हणत सतेज पाटील यांच्या राजर्षी छत्रपती शाहू परिवर्तन आघाडीच्या २९ उमेदवारांना अपात्र करण्याचा निर्णय निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी २९ मार्चला घेतला होता. या निर्णयाविरोधात सतेज पाटील गटाने प्रादेशिक सहसंचालक (साखर) कोल्हापूर विभाग, कोल्हापूर यांच्याकडे ३१ मार्चला अपील दाखल केले होते. तर प्रादेशिक सहसंचालक (साखर) कोल्हापूर विभाग कोल्हापूर यांनी रविवार म्हणजे काल रात्रीच १२ वाजता संबंधितांना निकालाच्या प्रती पोहोचवत अपील नामंजूर केले आहे.
प्रतिक्रिया देत सतेज पाटील म्हणाले…
प्रादेशिक सहसंचालक (साखर) कोल्हापूर विभाग यांनी घेतलेल्या निर्णयामुळे सतेज पाटील यांना निवडणुकीत दुसऱ्यांदा धक्का बसला आहे. तर निर्णयाविरोधात सतेज पाटलांनी आता उच्च न्यायालयात जाणार असल्याचे सांगितले आहे. तसेच भाजप आणि महाडिक यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ‘सत्तेचा वापर करत अधिकाऱ्यांवर दबाव टाकला असल्याचे स्पष्टपणे दिसत असून काल सुट्टी असतानाही प्रादेशिक सहसंचालकानी रात्री बारा वाजता निकाल दिला आहे. २९ उमेदवार ठेवून लढाई करण्याचं धाडस महाडिक यांच्यात नाही. त्यांनी २९ उमेदवारांना बाजूला केले असले तरी आता लढाई ५० जणांबरोबर आहे. महाडिक यांच्यात जिंकायचा आत्मविश्वास असेल तर २९ उमेदवारी अर्ज ठेवून लढायचं होतं. मात्र महाडिक आता भ्याले आहेत हे कोल्हापूरकरांनी देखील पाहिले आहे. आज घेतलेला हा निर्णय आता राजाराम कारखान्यापूरता मर्यादित राहणार नाही. राज्यातील सर्व साखर कारखान्यांमध्ये लागू होईल. हा कारखाना खासगी होऊ नये यासाठी आमची लढाई सुरू आहे. या निर्णयाविरोधात आम्ही हायकोर्टात जाणार आहोत. निकाल कधीही लागू दे, पण महाडिक यांची चूक आहे हे दाखवून देण्यासाठी आम्ही कोर्टात जाणार आहोत’, असे सतेज पाटील म्हणाले.
‘महाडिक यांनी रडीचा डाव खेळायला नको होता’
‘महाडिक यांनी रडीचा डाव खेळायला नको होता. ऑफिस टाइममध्ये निकाल द्यायला पाहिजे होता. निवडणूक होणार, आम्ही कोणत्याही परिस्थितीत माघार घेणार नाही’, असेही सतेज पाटील म्हणाले आहेत.
अशी आहे निवडणूक प्रक्रिया
राजाराम कारखान्याची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. दोन दिवसांनी म्हणजे बुधवारी १२ एप्रिलला उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. गुरुवार १३ एप्रिलला अंतिम उमेदवार यादी प्रसिद्ध होणार आहे. तर २३ एप्रिलला मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. आमदार सतेज पाटील आता काय भूमिका घेणार याकडे मतदार सभासदांचे लक्ष लागले आहे. या निवडणुकीने जिल्ह्याचे वातावरण तापले आहे.
करवीर निवासिनी अंबाबाईचा रथोत्सव; १५०० किलो वजनाचा दुमजली रथ अन् लाखोंच्या संख्येनं भाविक