• Mon. Nov 25th, 2024
    तुम्ही लवकरच मुख्यमंत्री होणार? नगर जिल्ह्यात जोरदार चर्चा, राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले…

    अहमदनगर : येत्या काही दिवसांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पायउतार होणार असून त्यांच्याजागी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना मुख्यमंत्रीपदाची संधी दिली जाणार आहे, अशा बातम्या गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियात व्हायरल होत आहेत. यावर विखे पाटील यांनी स्वत: प्रतिक्रिया दिली आहे, असे काहीही होणार नसून मला बदनाम करण्यासाठी हे षडयंत्र असून कपोलकल्‍पीत बातम्या दिल्या जात आहेत, असे विखे पाटील म्हणाले.विखे पाटील यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांना नगर जिल्ह्यात सोशल मीडियात व्हायरल होत असलेल्या या बातम्यांसंबंधी विचारण्यात आले. त्यावर विखे पाटील म्हणाले, “माझ्या संदर्भात पसरविले जात असणारे वृत्‍त हे कपोलकल्‍पीत आणि मला बदनाम करण्‍याचे षडयंत्र आहे. अशा वावड्या पसरविण्‍याचे काम काही मंडळी करीत आहेत”.

    “माझी बदनामी करण्‍याच्‍या हेतू आहे. यामध्‍ये कोणतेही तथ्‍य नाही, राज्‍याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्‍या माध्‍यमातून सक्षम नेतृत्‍व मिळाले आहे. राज्‍याचा हा निर्णय पंतप्रधानांच्या स्‍तरावर झाला असल्‍याने यामध्‍ये कुठलीही विसंगती असण्‍याचे कारण नाही”, असेही विखे पाटील म्हणाले.

    शरद पवारांची भूमिका योग्यच…

    राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि विखे पाटील कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी आहेत. मात्र, पवार यांनी अलीकडेच अदानी समूहाबद्दल मांडलेल्या नव्या भूमिकेचे विखे पाटील यांनी कौतूक केले आहे. विखे पाटील म्हणाले, अदानी उद्योग समूहाच्या संदर्भात ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी घेतलेली भूमिका योग्यच आहे. जेपीसीच्या मागणीवरून राजकारण करणारे विरोधक देशातील गुंवणूकदारांचे झालेले अर्थिक नूकसान भरून देणार आहेत काॽ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाच्या विकासाचा आलेख उंचावत आहे.

    मोदींच्या यशस्वी कारकीर्दीवर विरोधकांना कुठेही बोट ठेवायला जागा नाही. आज जगातील कित्येक भांडवलदार देश अडचणीत असताना भारतात खासगी उद्योगांच्या माध्यमातून होत असलेली गुंतवणूक उद्योग व्यवसायाची प्रगती महत्वपूर्ण आहे. त्‍यामुळेच भारताची प्रतिमा जगामाध्‍ये आज वेगळ्या स्‍वरुपात पाहायला मिळत आहे. परंतु हिडनबर्ग सारखी कोणतीतरी संस्‍था येवून अहवाल देते आणि एखाद्या उद्योग समूहाला बदनाम करण्याचा प्रयत्‍न होतो. न्यायालयाने यासाठी समिती नेमली आहे. समितीचा काय अहवाल यायचा तो येईल. परंतु जेपीसीच्या मागणीवरुन संपूर्ण संसद आणि देशाला वेठीस धरण्‍याचे विरोधकांचे सुरु असलेले काम हे फक्‍त पंतप्रधान मोदी यांना बदनाम करण्‍यासाठी असले तरी, विरोधकांचे हे कारस्‍थान कदापिही यशस्वी होणार नाही, असे विखे पाटील म्हणाले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed