या कार्यक्रमात अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य फुंकण्याचा प्रयत्न केला.राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून साताऱ्याची राज्यात ओळख आहे. लोकांमध्ये मिसळा, त्याच्या कामांना प्राधान्य द्या, हा बालेकिल्ला अभेद ठेवण्याची जबाबदारी सर्वाची आहे. कोण कितीही मोठ्या बापाचा असला तरी घाबरण्याचे कारण नाही. कार्यकर्त्यांनी आपले काम प्रामाणिक करावे. अमित आणि माझ्यात नेहमीच आपलेपणाची भावना होती. तो प्रवाहातून थोडा दूर झाला होता. त्याचा पक्ष प्रवेश नव्हे तर घरवापसी झाली आहे. नेत्यांना कार्यकर्त्यांना त्याच्या येण्याने आनंद झाला असून त्याने आपली उपयुक्तता सिद्ध करावी, असे वक्तव्य अजितदादा पवार यांनी केले. ते रविवारी साताऱ्यात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलत होते.
स्व. यशवंतराव चव्हाण साहेब, शरद पवार साहेब यांच्यावर प्रेम करणारा हा सातारा जिल्हा आहे. सुरुवातीच्या काळात जिल्ह्याने दोन खासदार आणि नऊ आमदार दिले. त्यानंतर एक खासदार आणि तीन आमदारावर आलेला आहे. याच आत्मचिंतन सगळ्यांनी केल पाहिजे, असे सांगून मी इथे निधी दिला तो बापू तुमच्याकडे बघून दिला. राष्ट्रवादीवर प्रेम करणारा जिल्हा एखाद्या वेळेस कुठेतरी चुकला म्हणून मी मंत्री असताना कसलाही निधी कमी पडून दिला नाही. माझ्याकडे वाढण्याचा अधिकार होता आणि कुठ तरी वाढण्याच काम कमी कराव हे मनाला पटत नव्हत. सैनिक स्कूल असो कि मेडीकल कॉलेज असो कि महाबळेश्वर तापोळा पर्यटन विकास असो. निधी देत गेलो. कधीही दुजाभाव केला नाही, असे पवार यांनी सांगितले.
मेढा, ता. जावळी येथे शेतकरी मेळावा व पक्षप्रवेश कार्यक्रम आयोजित केला होता. त्या वेळी ते बोलत होते. कार्यक्रमास खासदार, श्रीनिवास पाटील, माजी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, आमदार शशिकांत शिंदे, आमदार मकरंद पाटील, आमदार दीपक चव्हाण, सारंग पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य दीपक पवार, जिल्हा अध्यक्ष सुनील माने आदी मान्यवर उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेस कायमच सर्वसामान्य जनतेच्या शेतकऱ्याच्या पाठीशी खंबीर आहे. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, शरद पवार यांच्या दाखविलेल्या रस्त्याने जाऊयात, यातून निश्चितपणे आपल्याला दिशा मिळणार आहे. महाविकास आघाडीने कोरोना काळात जनतेच्या आरोग्याची काळजी घेण्याबरोबरच विकासाचा रथ यशस्वीरीत्या हाकला आहे. आपल्यात कोणतीही दुफळी होणार नाही याची दक्षता घ्यावी लागणार आहे, असे अजित पवार यांनी म्हटले.