राज्य शासनाची जलमिशन योजना युद्धपातळीवर सुरू असताना प्रत्येक नागरिकांच्या घरात स्वच्छ व शुद्ध पाणी पोहोचविण्याचे उद्दिष्ट आहे. मात्र खारपणपट्यातील अकोला जिल्ह्यातील कवठा गावातील मन नदीच्या पत्रात उलटं चित्रं पाहायला मिळत. इथे आजही गावकरी मन नदीकाठावर खड्डे खोदून झिरे बनवतात आणि ‘या’ झिऱ्यामधून पिण्यासाठी पाणी काढतात, ‘मन नदी’मध्ये विहीर आहे. परंतु, ते पाणी पिण्यायोग्य नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
सकाळी लवकर उठून शेतमजूर शेतात जाऊन काम करतोय. घरी परतल्यावर ‘भर उन्हाळ्यात’ ‘रखरखत्या ऊन्हात’ नागरिकांना पाय भाजत नदीवरून पाणी आणावे लागते. तब्बल १ किमी पेक्षा जास्त पायी चालत परत वर चढावे लागते. त्यामुळे कवठा येथील नागरिकांचे चांगलेच हाल होत आहेत. अंदाजे गेल्या २५ वर्षांपासून ही समस्या या ‘कवठा’ गावाला आहे. गावामधून जाणाऱ्या नदीवर बॅरेज (धरण) बांधण्यात आला आहे. आणि गावामध्ये पाणीपुरवठा करण्यासाठी नदीपात्रात विहिर सुद्धा करण्यात आली. मात्र विहिरी जवळ गावातील सांडपाणी जाते. आणि गावातील पाण्याची टाकीसुद्धा स्वच्छ केली जात नाही. त्यामुळे गावकरी विहिरीच्या पाण्याचा उपयोग पिण्यासाठी करत नाहीत.
विहिरीच्या या पाण्यावर वॉटर फिल्टर बसवण्यात आले तर हेच पाणी नागरिकांना पिण्यासाठी उपयुक्त ठरू शकेल. ज्या गावात बॅरेज त्या गावात पाणी पातळी भरपूर असते. मात्र कवठा गावाजवळच असलेल्या लोहाऱ्यात पुलाचे बांधकाम सुरू असल्याने या बॅरेजच पाणी सोडण्यात आलं होतं. त्यामुळे आता नदीपात्र ठणठणाट आहे. बॅरेजच पाणी सोडण्यात आल्याने, गावातील हातपंपांची पातळी खोलवली गेली.
आज शेतमजूर असो किंवा शाळकरी विध्यार्थी या सर्वांना पिण्याच्या पाण्यासाठी नदीपात्रातील झिऱ्यांवर खेपा माराव्या लागत आहे. आता आपण गाव सोडून कधी जातो. असा प्रश्न येथील मुलींच्या मनात सतत सुरू असतोय.
बाळापूर मतदारसंघातील ६९ गावांसाठीच्या पाणीपुरवठा योजनेसाठी वान धरणातील ३.३५ दलघमी (दहा लाख घनमीटर) पाण्याचं आरक्षण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाने झालं होतं रद्द. हे योजना कवठा गावात पण लागू होणार होती. मात्र आरक्षण रद्द झाल्याने गावकऱ्यांची समस्या कायम आहेय.
गावातील मुलांची लग्नं रखडली
दरम्यान गावकऱ्यांनी सांगितले की गावात पाण्याची समस्या असल्याने बाहेर गावातील लोक आपल्या मुलीचे लग्न या गावात करू इच्छित नाहीत. जर मुली दिल्या जातात तर अनेक अटीशर्ती मुलांसमोर समोर ठेवल्या जातात. या समस्येबाबत अनेकदा ग्रामपंचायतमध्ये ठराव मांडला गेला अन् प्रशासनाकड़ं पाठपूरवठा केला. पण अजूनही समस्येवर तोडगा निघाला नाही, असे ग्रामपंचायत सदस्य सांगतात.
कवठा या गावांमध्ये शासनाने पाण्यासाठी उपाययोजना दिल्या आहेत, मात्र त्या नागरिकांना उपयोगी ठरतात दिसत नाहीत. शासनाने आधीच दिलेल्या पाणीपुरवठ्याच्या योजनेवर आरो वॉटर फिल्टर बसवलं तर नागरिकांना विहिरीचं पाणी पिण्यासाठी वापरता येईल, आणि अनेक वर्षांपासून पाण्यासाठी होणारी पायपीट थांबू शकणार.