• Sat. Sep 21st, 2024
चवीने बघणारे लोक आहेत तोपर्यंत…प्रिया बेर्डे यांची गौतमी पाटीलवर सडकून टीका

सांगली : प्रसिद्ध लोककलावंत रघुवीर खेडकर यांनी गौतमी पाटील हिला सुनावून २४ तास उलटत नाही तोच ज्येष्ठ मराठी अभिनेत्री प्रिया बेर्डे यांनीही गौतमीवर सडकून टीका केली आहे. ‘जोपर्यंत बघणारे थांबणार नाहीत, तोपर्यंत हे असंच चालू राहील, अशी टीका करताना आम्ही याविरोधात आवाज उठवू. लोक ट्रोलिंग करु देत पण म्हणून आम्ही बोलायचं थांबवणार नाही, असा इरादाही प्रिया बेर्डे यांनी बोलून दाखवला.महाराष्ट्रात सध्या गौतमी पाटीलच्या नृत्याच्या शैलीवरुन वादंग सुरु आहे. दररोज कुणी ना कुणी गौतमीच्या नाचण्याकडे बोट दाखवतो, त्यावर आक्षेप घेतो. बरं गौतमीच्या कार्यक्रमात होणारे राडेही थांबण्याचं नाव घेत नाही. या सगळ्यामुळे महाराष्ट्राचं सांस्कृतिक विश्वही ढवळून निघालं आहे. या सगळ्यावर सांस्कृतिक क्षेत्रातले लोक व्यक्त होऊ लागले आहेत. ज्येष्ठ तमाशा कलावंत रघुवीर खेडकर यांनी गौतमीवर नाराजी व्यक्त केल्यानंतर प्रिया बेर्डे यांनी खेडकर यांच्याच सुरात सूर मिसळला आहे.

काय म्हणाल्या प्रिया बेर्डे?

गौतमी पाटीलवर बोलताना प्रिया बेर्डे म्हणाल्या, “तिचे कार्यक्रम बघणारे लोक या सर्व गोष्टीला जबाबदार आहेत. अशा प्रकारची गाणी, तमाशा चवीने बघणारे जोपर्यंत आहेत, तोपर्यंत हे असंच सुरु राहणार. ज्यादिवशी लोक चिडून असे शो बंद करतील, त्यादिवशी असे प्रकार बंद होतील. तोपर्यंत आम्ही आणि राज्यकर्त्यांनी कितीही ओरडून निषेध केला, तरी काहीही फरक पडणार नाही”

“लोक खूप सारं मानधन देऊन तिला बोलावतात, आम्ही काही बोललो की आम्हालाही ट्रोल केलं जातं, आमच्यावर टीका टिप्पणी होते, पण आम्ही ट्रोल होतो म्हणून बोलायचं थांबवणार, याचा असा अर्थ नाही. आम्ही बोलणार…. पण लोक जोपर्यंत बघणं बंद करत नाही, तोपर्यंत या गोष्टी चालणार”

ना राडा, ना गोंधळ; गौतमीचा कार्यक्रम पहिल्यांदाच शांततेत पार पडला; गावाचं परफेक्ट नियोजन

रघुवीर खेडकर काय म्हणाले होते?

बऱ्याच गावचे लोक १०० कलाकार असणाऱ्या तमाशाला २ लाख रुपये द्यायला पुढे मागे पाहतात किंबहुना द्यायला तयारच होत नाहीत. पण चार पोरी आणि पाचवी गौतमी पाटीलला पाच पाच लाख रुपये अगदी आनंदाने मोजतात, महाराष्ट्रात हे काय सुरुये? लोककलेची गौतमी पाटील करु नका, लोककला आहे ती लोककला राहिलीच पाहिजे. लोककला जपली पाहिजे. महाराष्ट्राचा बिहार करु नका, अशा शब्दात रघुवीर खेडकर यांनी नाराजी व्यक्त केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed