• Sun. Sep 22nd, 2024
अकोल्यात आरती सुरु असताना झाड कोसळलं; शेडखाली ५० लोक दबले, ४ मरण पावल्याची भीती

अक्षय गवळी, अकोला : अकोला जिल्ह्यात आज सायंकाळी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. दरम्यान बाळापूर तालुक्यात असलेल्या पारस गावात बाबूजी महाराज संस्थानामध्ये सायंकाळीची आरती सुरू असताना मंदिराच्या परिसरात असलेल्या टिनाच्या शेड खाली आरतीसाठी अनेक लोक उपस्थित होते. त्यावेळी मंदिराला लागून भलं मोठं कडुलिंबाचे झाड अचानक उन्मळून टिनाच्या शेडवर कोसळले. त्यावेळी शेड खाली असलेले सर्व लोक दबले गेले. या घटनेत आतापर्यंत चार लोकांना आपला जीव गमावावा लागलाय. तर काही लोकांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलंय, अशी माहिती बाळापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनिल जुंबळे यांनी ‘मटा ऑनलाइन’शी बोलताना दिली आहे.अकोला जिल्ह्यातल्या बाळापूर तालुक्यात पारस हे गाव आहे. इथे बरड परिसरात बाबूजी महाराज संस्थानाचं मंदिर आहे. आज रविवार असल्याने सायंकाळी आरतीसाठी लोकांची प्रचंड गर्दी होती. तसेच संस्थान परिसरात टिनाचं मोठे शेड असल्यामुळे इथेही चाळीस ते पन्नास लोक आरतीसाठी उपस्थित होते. दरम्यान अचानक आज सायंकाळी पाऊस आणि वादळीवारा सुरू झाला. यावेळी मंदिराच्या संस्थांना लागून मोठ कडुलिंबाचे झाड अचानक उन्मळून मंदिराच्या टिनाच्या शेडवर कोसळलं.

यावेळी शेड अन् पूर्णपणे झाड पडल्याने त्याखाली चाळीस ते पन्नास लोक पूर्णपणे दबले गेले. पाऊस आणि वारा यामुळे मदत आणि बचाव कार्यात अडथळा येत आहे. जेसीबी आणि रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचल्या आहेत. तसेच बाळापूर पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत.

या घटनेत आतापर्यंत चार लोकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त होत आहे, तर ४० हून अधिक जखमी झाल्याची चर्चा आहे. तरीही या घटनेत आतापर्यंत वीस लोकांना ९ वाजेपर्यत सुखरूप बाहेर काढण्यात आले होते. सद्यस्थितीत मृतांचा आकडा चार असल्याचं समजत असून जखमी लोकांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान मृतांची नावे अद्यापपर्यंत कळू शकलेली नाहीयेत.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच बाळापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अनिल जुंबळे सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले आहेत आणि त्यांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने मृत आणि जखमींना बाहेर काढण्याचं बचावकार्य हाती घेतलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed