हवामान खात्याने तब्बल तीन ते चार दिवस अवकाळी पावसाचा इशारा दिला होता. बीडमध्ये आज सकाळपासूनच पावसाने हजेरी लावली होती. सायंकाळी चारच्या नंतर सुरु झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालं आहे. गहू, ज्वारी, टरबूज, आंबा यासोबत भाजीपाल्यांचे मोठे नुकसान झाल्याने आता शेतकऱ्यांसमोर मोठं आव्हान उभा राहिलं आहे. यापूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळं नुकसानाची भरपाई अद्याप मिळालेली नाही. आजच्या अवकाळी पावसानं शेतकऱ्याच्या काळजाचा ठोका चुकला आहे.
आष्टी तालुक्यातील सुरुडी येथील शेतकरी शेळ्या चारण्यासाठी शेतात गेला होता. विजांचा कडकाडासह जोरदार पाऊस आल्याने शेतकऱ्याने चिंचेच्या झाडाचा सहारा घेतला होता. त्यांच्या सोबत काही शेळ्या होत्या. मात्र, सायंकाळी पाच वाजता सुमारास या शेतकऱ्याच्या अंगावर वीज पडल्यानं त्यांचा मृत्यू झाला आहे. महादेव किसन गरजे वय ६० वर्ष असं त्यांचं नाव आहे. अंगावर वीज कोसळल्यानं महादेव गरजे यांचा जागीच मृत्यू झाला. गरजे यांच्या सोबत असलेल्या शेळ्यांचा देखील जागीच मृत्यू झाला आहे.
या घटनेची माहिती तात्काळ पोलीस प्रशासनाला देण्यात आली. यानंतर पोलीस प्रशासनाने धाव घेऊन महादेव गरजे यांच्या मृतदेहाचा पंचनामा केला. आष्टी ग्रामीण रुग्णालयात महादेव गरजे यांचा मृतदेह शवविच्छेदानासाठी पाठवण्यात आला असल्याची माहिती सध्या पुढे. अवकाळी पावसादरम्यान गरजे कुटुंबाचा आधार असणारे महादेव गरजे आणि उत्पन्नाचा आधार असलेल्या शेळ्यांचा मृत्यू झाल्यानं गरजे कुटुंबावर दु:खाचा दुहेरी डोंगर कोसळला आहे. सुरुडी परिसरात महादेव गरजे यांच्या निधनानं हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, एक मुलगी सून, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
घाईगडबडीत कर्ज हवं म्हणून अॅपवरून पैसे घेताय? थांबा ! लोन अॅप घोटाळा समजून घ्या