परभणी : परभणीच्या गंगाखेड तालुक्यातील मालेवाडी येथे श्री दरलिंगेश्वर यात्रेनिमित्त आयोजित कुस्ती स्पर्धेत आगळावेगळा विक्रम घडला. प्रख्यात कुस्तीपटू गीता फोगट यांच्यापासून प्रेरणा घेत तालुक्यातील खोकलेवाडीच्या मोनिका भागवत बिडगर हिने चक्क पुरुष कुस्तीपटूशी सामना केला. इतकंच नाही, तर त्याला चितपट करुन विजयही मिळवला. मोनिकाने सुमारे २०० वर्षांची परंपरा असलेल्या कुस्ती स्पर्धेत आपला स्वतंत्र ठसा उमटवत जणू ‘दंगल’ चित्रपटाची आठवण करुन दिली. परभणी जिल्ह्यात गंगाखेड तालुक्यातील मालेवाडी गावात श्री दरलिंगेश्वर यात्रेनिमित्त २०० वर्षांपासून दरवर्षी कुस्ती स्पर्धा आयोजित केल्या जातात. यावर्षीच्या स्पर्धेतील शुक्रवारचा दिवस अतिशय वेगळ्या कारणाने गाजला. तालुक्यातील खोकलेवाडीतील मोनिका बिडगर या तरुणीने यापूर्वी अनेक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवलेला आहे. मात्र इथल्या स्पर्धेत प्रथमच सहभाग नोंदवत तिने पुरुष स्पर्धकावर विजय मिळवला.
मधमाश्यांचे मोहोळ उठले, बघता-बघता पित्याच्या चेहऱ्याला डंख, लेकाच्या डोळ्यादेखत तडफडून अंत
महावीरसिंह फोगट या महान भारतीय कुस्तीपटूवर आधारित २०१६ मध्ये प्रदर्शित झालेल्या दंगल या बॉलिवूड चित्रपटात आमिर खानने मुख्य व्यक्तिरेखा रंगविली होती. गीता फोगट व बबिता कुमारी या आपल्या मुलींना कुस्ती शिकविण्याचे काम महावीर फोगट हाती घेतात. यात गीताने एका पुरुष कुस्तीपटूला धूळ चारल्याचं दृश्य पाहायला मिळालं होतं. या चित्रपटातील सीनच्या आठवणी मोनिकाने केलेल्या प्रत्यक्ष कामगिरीमुळे ताज्या झाल्या.प्रतीक्षा बागडी महाराष्ट्राची पहिली महिला महाराष्ट्र केसरी
गीता फोगटपासून प्रेरणा घेत खोकलवाडीसारख्या ग्रामीण भागातून आलेल्या मोनिका बिडगरने राज्यस्तरावर आपले कुस्ती नैपुण्य दाखवले. ही बाब ग्रामीण भागातील क्रीडा क्षेत्रासह विशेषतः महिला खेळाडूंसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरावी अशी आशा व्यक्त केली जात आहे.
कारच्या चावीने जीव घेतला, नाशिकमधील खुनाचं गूढ उकललं, धागेदोरे मुंबई ते हरियाणापर्यंत