रुग्णालयात तब्बल दोन ते तीन तास प्रचंड गोंधळ पाहायला मिळाला. पोलिसांनी हस्तक्षेप करत रुग्णालयात दाखल करणार्या एका तरुणाला तात्काळ ताब्यात घेतलं, तर अन्य तीन संशयितांना दोन तासांमध्ये शोधून चौकशी सुरू केली. मयत तरुण हा तलवाडा पोईतांडा येथील आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या तरुणाची हत्या झाली असावी, असा अंदाज वर्तवला जात आहे.
नेमकं काय घडलं?
गेवराई तालुक्यातील पोईतांडा येथील रामेश्वर ज्ञानेश्वर राठोड वय १८ या तरुणाला काल सायंकाळी त्याच्या मित्रांनी जेवणासाठी ढाब्यावर बोलावले होते. अशी माहिती कुटुंबीयांनी दिली. मात्र, तरुणाचा मृतदेह तलवाडा परिसरातील मेघदूत हॉटेलच्या शेजारी पडल्याची माहिती कुटुंबीयांनी मिळाली. कुटुंबीयांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, तोपर्यंत त्याच्या दोन मित्रांनी रामेश्वरचा मृतदेह गेवराईतील खासगी रुग्णालयात नेला. त्यावेळी डॉक्टरांनी तो मृत असल्याचे सांगितले. हे ऐकताच एक तरुण घटनास्थळावरून पसार झाला. मात्र, दुसर्या तरुणाने रुग्णवाहिकेने रामेश्वरचा मृतदेह गेवराई उपजिल्हा रुग्णालयात आणला.
तोपर्यंत रामेश्वरच्या कुटुंबीयांनी रुग्णालयामध्ये मोठी गर्दी केली होती. रामेश्वरचा मृतदेह पाहिल्यानंतर त्याच्या अंगावर काही खूणा आढळून आल्या. त्यामुळे कुटुंबीयांनी संतप्त होत “मारेकर्यांना तात्काळ अटक करा”, म्हणत शवविच्छेदन रोखले. संतप्त कुटुंबीयांनी आक्रोश करायला सुरूवात केल्याने घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर पोलिसांचा फौजफाटा आला.
परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तात्काळ रामेश्वरला रुग्णालयात दाखल केलेल्या एका तरुणाला ताब्यात घेतले. त्याचबरोबर अन्य तिघांचा तात्काळ शोध घेत त्यांना ताब्यात घेतले. रामेश्वरचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? हे अद्याप गुलदस्त्यात असले तरी प्रथमदर्शी रामेश्वरची हत्या झाली असावी, असा कयास काढला जात आहे. हतेच्या दिशेने तलवाडा पोलीस तपास करत आहेत.