• Mon. Nov 25th, 2024

    बिल्डरच्या चुकीमुळं मुंबईकरांवर पाणी कपातीचे संकट; तब्बल पाच महिने होत होती पाण्याची नासाडी

    बिल्डरच्या चुकीमुळं मुंबईकरांवर पाणी कपातीचे संकट; तब्बल पाच महिने होत होती पाण्याची नासाडी

    म. टा. खास प्रतिनिधी, मुंबईः बांधकाम व्यावसायिकाने जलबोगद्याची माहिती न घेता ठाण्यातील वागळे इस्टेट येथे बोअरवेल खोदताना मुंबई पालिकेच्या १८ फूट व्यासाच्या जलबोगद्याला भगदाड पाडल्याचे समोर आले आहे. त्यामुळे मुंबईकरांवर पाणीकपातीचे संकट ओढवले. विकासकाच्या चुकीमुळे तब्बल पाच महिने पाण्याची नासाडी झाली. या बांधकाम व्यावसायिकाविरोधात एका तक्रारदाराने ठाण्यातील श्रीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.भांडुप संकुल येथील जलशुद्धीकरण केंद्रास ७५ टक्के पाणीपुरवठा हा ५,५०० मिलीमीटर व्यासाच्या १५ किलोमीटर लांब जलबोगद्याद्वारे होतो. या जलबोगद्याला ठाणे येथे कूपनलिकेच्या खोदकामामुळे हानी पोहोचून गळती होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर ही गळती दुरुस्त करण्याचे काम मुंबई पालिकेकडून ३१ मार्चपासून सुरू करण्यात आले. त्यामुळे ३१ मार्चपासून एक महिना मुंबई पालिका क्षेत्रातील तसेच ठाण्यातील पाणीपुरवठ्यात १५ टक्के पाणीकपात लागू आहे. यामुळे मुंबईकरांवर पाणीसंकट कोसळले आहे.

    एका बांधकाम व्यवसायिकाने ठाणे येथील वागळे ओद्योगिक क्षेत्र येथे बेकायदेशीररित्या बोअरवेल खणली. त्यामुळे मुंबई पालिकेच्या १८ फूट व्यासाच्या जलबोगद्याला भगदाड पडले. तसेच वाहणारे पाणी दोन पाइपलाइनने पंपाद्वारे ड्रेनेजमध्ये सोडले जात असल्याचे तक्रारदाराच्या निदर्शनास आले. मागील पाच महिन्यांपासून हा प्रकार होत असल्याचेही समोर आले. त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेले. मुंबई पालिकेच्याही ही बाब निदर्शनास आली.

    ७५ कोटींच्या वसुलीसाठी पालिकेचे पत्र

    एमआयडीसी हद्दीत घडलेल्या या घटनेची गंभीर दखल मुंबई महापालिकेने घेतली. पाच महिन्यांत नासाडी झालेल्या पाण्याची रक्कम आणि दंड असे ७५ कोटी रुपये संबंधित बांधकाम व्यावसायिकाकडून वसूल करावे, असे पत्र पालिकेने ‘एमआयडीसी’ला दिल्याचे पालिकेतील सूत्रांनी सांगितले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed