• Mon. Nov 25th, 2024
    महात्मा गांधींच्या सूचनेवरूनच वीर सावरकरांचे माफीपत्र: देवेंद्र फडणवीस

    मुंबई: महात्मा गांधी यांच्या सूचनेवरून स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी इंग्रज सरकारला माफीपत्र लिहिले होते, असा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. राहुल गांधी तुम्ही म्हणता, मी सावरकर नाही. पण, तुम्ही सावरकर नाही आणि तुम्ही गांधीही नाही. सावरकर होण्याची तुमची औकातही नाही, अशा शब्दांत फडणवीसांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला. ते सोमवारी कांदिवलीत स्वा. सावरकर गौरव यात्रेत बोलत होते.

    यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाला खडे बोल सुनावले. संसदेत बंगालच्या खासदाराने जेव्हा वीर सावरकरांच्या गौरवाचा ठराव मांडला, तेव्हा त्याचे समर्थन करणारे तुमचे आजोबा होते, फिरोज गांधी. इंग्लंडच्या राणीची मर्जी होईल, तेव्हा स्वातंत्र्य मिळेल, अशी धारणा नव्हती. स्वातंत्र्य आम्हाला भीकेत नको होते. त्यामुळे सशस्त्र क्रांती झाली. वीर सावरकर यांनी १८५७ च्या स्वातंत्र्यसमरावर पुस्तक लिहिले. त्याने लाखो क्रांतिकारकांना प्रेरणा दिली. एकाच व्यक्तीला दोन जन्मठेप झाल्या, असे वीर सावरकर एकमात्र आहेत. त्या शिक्षा झाल्या, तेव्हा इतके वर्ष तुमचे सरकार तरी चालणार आहे का, असे इंग्रजांना विचारण्याचीही हिंमत वीर सावरकरांनी दाखविली होती. सगळे स्वातंत्र्यसेनानी महान आहेत. पण, वीर सावरकरांनी ज्या यातना भोगल्या, त्या कुणाच्या वाट्याला आल्या नाहीत, असे देवेंद्र फडणवीस यांनी ठणकावून सांगितले.

    वीर सावरकर आणि नेताजी सुभाषचंद्र बोस या दोन व्यक्तींना कायमच काँग्रेसने विरोध केला. अंधश्रद्धेच्या विरोधात, अस्पृश्यतेच्या विरोधात वीर सावरकरांनी लढा दिला. हिंदुत्त्वाचा विज्ञाननिष्ठ विचार मांडणारे वीर सावरकर होते. मराठी भाषेला शेकडो शब्द देणारे वीर सावरकर होते. छत्रपती शिवाजी महाराजांवर आरती लिहिणारे सुद्धा वीर सावरकरच होते. वीर सावरकरांचा वारंवार अपमान करणार्‍यांच्या मांडीला मांडी लावून बसणारे लोक आहेत, हे मात्र दुर्दैवी आहे.हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंनी जसे मणिशंकर अय्यरच्या फोटोला जोडे मारले, तसेच तुम्हीही राहुल गांधींच्या फोटोला जोडे मारण्याची हिंमत दाखविली असती, तर मानले असते. तुमचे हिंदुत्त्व बेगडी आहे.तुम्हाला ज्याच्यासोबत जायचे असेल त्याच्यासोबत जा. पण, आम्ही हिंदुत्त्व सोडणार नाही. तुम्ही जेव्हा-जेव्हा वीर सावरकरांचा अपमान कराल, तेव्हा तेव्हा अशीच जनता रस्त्यावर उतरेल आणि तुम्हाला तुमची जागा दाखवून देईल, असे टीकास्त्र देवेंद्र फडणवीस यांनी सोडले.

    उद्धव ठाकरेंनी राजीव गांधींच्या प्रतिमेला पुष्पहार घातला पण गांधी परिवाराने बाळासाहेबांना आदरांजली वाहिली नाही: फडणवीस

    देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात उद्धव ठाकरे यांना डिवचले. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीदिनी प्रतिमेला पुष्पहार घातले. मात्र शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल किंवा प्रियांका यांनी समाजमाध्यमांवरूनही आदरांजली वाहिली नाही, याकडे देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed