• Sat. Sep 21st, 2024

कौशल्य विकास विभागातर्फे मुंबईत आयोजित रोजगार मेळाव्यात ८ हजार ३२२ पदांकरिता मुलाखती

ByMH LIVE NEWS

Apr 1, 2023
कौशल्य विकास विभागातर्फे मुंबईत आयोजित रोजगार मेळाव्यात ८ हजार ३२२ पदांकरिता मुलाखती

मुंबई, दि. 1 : कौशल्य विकास विभागांतर्गत असलेल्या मुंबई शहर जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत नायगाव, दादर (पूर्व) येथे आज झालेल्या पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यात विविध उद्योग, कंपन्या आणि कॉर्पोरेट संस्थांनी त्यांच्याकडील 8 हजार 322 पदांसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. मेळाव्यात नोकरीइच्छुक उमेदवारांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. मेळाव्यात 30 उद्योग तथा कंपन्यांनी सहभाग घेतला. राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते या मेळाव्याचे उद्घाटन झाले.

नायगाव, दादर (पूर्व) येथील स्प्रिंग मिल कंपाउंड येथे झालेल्या या कार्यक्रमास आमदार कालिदास कोळंबकर, मेळाव्याचे समन्वयक प्रदीप दुर्गे, कौशल्य विकास विभागाचे अधिकारी, स्थानिक पदाधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनीही या मेळाव्याला भेट देऊन पाहणी केली.

5 लाख रोजगार देण्याचे उद्दिष्ट – मंत्री मंगलप्रभात लोढा

मंत्री श्री. लोढा यावेळी म्हणाले की, कौशल्य विकास विभागाने तरुणांना कौशल्य विकासाबरोबरच रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. यासाठी राज्यात रोजगार मेळावे आयोजित करण्यात येत आहेत. राज्य शासनाने 75 हजार सरकारी नोकऱ्या देण्याचा निर्धार केला आहे, त्याचबरोबर कौशल्य विकास विभागाद्वारे विविध कंपन्या, उद्योग, कॉर्पोरेट क्षेत्र यांच्याशी समन्वय साधून येत्या काळात पाच लाख रोजगार देण्यात येतील. युवक-युवतींना त्यांच्या आवडीनुसार कौशल्य प्रशिक्षण आणि त्यानंतर खात्रीची नोकरी देण्यासाठी कौशल्य विकास विभाग विविध उपक्रम प्रभावीपणे राबवेल. राज्यभरात सर्व जिल्ह्यांमध्ये रोजगार मेळावे घेण्यात येणार आहेत, असे त्यांनी सांगितले.

मेळाव्यात विविध कंपन्यांनी सहभाग घेत त्यांच्याकडील विविध रिक्त पदांसाठी नोकरीइच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. त्याचबरोबर मेळाव्यात विविध शासकीय मंडळेही सहभागी झाली. त्यांनी स्वयंरोजगारासाठी असलेल्या त्यांच्याकडील विविध कर्ज योजनांची माहिती यावेळी उमेदवारांना दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed