• Sat. Sep 21st, 2024
संयोगिताराजे छत्रपतींनी खडे बोल सुनावले, नाशिकच्या काळाराम मंदिरातील तो पुजारी म्हणाला….

नाशिक: कोल्हापूर येथील छत्रपती घराण्यातील संभाजीराजे भोसले यांच्या पत्नी संयोगिता राजे छत्रपती यांना पंचवटी येथील प्रसिद्ध काळाराम मंदिरात वेदोक्त पद्धतीने मंत्र म्हणण्यास मज्जाव केल्याचा मुद्दा सध्या राज्यभरात चांगलाच गाजत आहे. संयोगिता राजे यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत हा सगळा प्रकार कथन केला होता. काळाराम मंदिरातील महंतांनी मला वेदोक्त मंत्राचा अधिकार नाही, असे सांगत आडकाठी घालण्याचा प्रयत्न केला, असा दावा संयोगिता राजे छत्रपती यांनी केला होता. त्यांच्या या पोस्टनंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली होती. अनेकांनी संयोगिता राजे यांच्या पाठिशी उभे राहत काळाराम मंदिरातील पुजाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. या सगळ्या वादानंतर आता काळाराम मंदिरातील संबंधित पुजारी हे संभाजीराजे छत्रपती यांचे वडील शाहू महाराज यांच्या भेटीला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

तो सनातन धर्म आम्हाला मान्य नाही, खुलेआम सांगावे लागेल, संयोगिताराजेंच्या समर्थनार्थ जितेंद्र आव्हाडांची खमकी पोस्ट

संयोगिता राजे छत्रपती यांच्याशी वाद झालेल्या पुजाऱ्याचे नाव महंत सुधीरदास असे आहे. त्यांनी संयोगिता राजे छत्रपती यांच्यासोबतच्या वादावर भाष्य केले आहे. हा प्रकार गैरसमजातून झाल्याची शक्यता महंत सुधीरदास यांनी वर्तविली. मात्र, या सगळ्यामुळे छत्रपती घराण्याचा अनादर होत असल्यास आपण दिलगिरी व्यक्त करतो, असेही त्यांनी सांगितले. महंत सुधीरदास हे लवकरच कोल्हापूर येथे थोरले शाहू महाराज यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर आपली बाजू मांडणार आहेत. त्यानंतर संभाजीराजे छत्रपती आणि संयोगिताराजे छत्रपती काय भूमिका घेतात, हे पाहावे लागेल.

नेमका वाद काय?

संयोगिता राजे छत्रपती यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली होती. यामध्ये संयोगिता राजे यांनी नाशिकच्या काळाराम मंदिरात आलेला अनुभव कथन केला होता. मंदिरातील पुजाऱ्यांनी माझ्या पूजेसाठी पुराणातील मंत्र म्हणण्याचा प्रयत्न केला. कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याच्या वारशामुळे मी ठामपणे विरोध केला. अनेक कारणे देऊन त्यांनी मला वेदोक्त मंत्राचा अधिकार कसा नाही हे सांगायचा प्रयत्न केला. शेवटी मी विचारले की ज्या मंदिरांमध्ये तुम्ही आजच्या काळातही जे नियम लावत आहात ती मंदिरे वाचविली कोणी? छत्रपतींनी वाचविली! मग छत्रपतींना शिकवण्याचे धाडस करू नका. तरीही मी महामृत्युंजय मंत्र जप का केला म्हणून त्यांनी प्रश्न केलाच… तेव्हा मात्र परमेश्वराच्या लेकराला, आपल्या ईश्वराला भेटायला आणि त्याची स्तुती करायला तुमच्या मध्यस्थीची गरजच नाही, असे सुनावले. त्यानंतर मी तिथेच रामरक्षा पण म्हणाली, असे संयोगिताराजे छत्रपती यांनी पोस्टमध्ये म्हटले होते.

संयोगिताराजेंना मंदिरात वेदोक्त मंत्र म्हणण्यास विरोध, आव्हाड संतापले, म्हणाले, सनातनी मनुवाद्यांचा माजोरडेपणा!

लेकरांना आपल्या आईवडिलांना भेटण्यासाठी कोणाची परवानगी कशाला हवी? या विचारानेच राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी अनेक क्रांतिकारक असे निर्णय घेतले होते. त्यांचा वैचारीक वारसा चालवण्याची जबाबदारी आणि त्यामुळे जे आत्मबल प्राप्त झाले त्यामुळेच परवा नाशिकमध्ये काळा राम मंदिरात महामृत्युंजय मंत्राचा जप बिनदिक्कत करू शकले. मात्र, या प्रसंगाने माझ्या मनात प्रश्न निर्माण झाला की शंभर वर्षात ही मानसिकता का बदलली नाही? अजूनही राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी सांगितलेल्या विचारांना खूप खोलवर रुजवावे लागणार आहेत, अशी खंतही संयोगिता राजे यांनी बोलून दाखवली होती.

नाशिकच्या काळाराम मंदिरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed